Breaking News

फणसाड अभयारण्यात जळीत रेषा काढण्याच्या कामाला वेग

मुरूड : प्रतिनिधी

जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी फणसाड अभयारण्यातर्फे दरवर्षी जळीत रेषा काढण्याचे काम केले जाते. रस्त्यालगत असणारे गवत अथवा झाडेझुडपे जाळून टाकली जातात, जेणेकरून वणव्यांपासून जंगलाचे संरक्षण केले जाईल. त्या अनुषंगाने मुरूड येथील नवाबांचा राजवाडा परिसरात जळीत रेषा काढण्याचे काम सुरू आहे. या वेळी फणसाड अभयारण्याचे वनरक्षक अरुण पाटील, डी. एम. शिंदे, डी. डी. कांबळे, मजूर मधू नाईक, हरेश पतेने आदी उपस्थित होते.

 या कामासाठी अभयारण्याचे कर्मचारी खूप मेहनत घेऊन जंगलातील पालापाचोळा व सुके गवत जाळून जंगलाचे संरक्षण करतात. रस्त्यालगतचे गवत जाळल्याने वणवे लागत नाहीत. मुरूड तालुक्यातील सुप्रसिद्ध फणसाड अभयारण्यात अनेक वन्यजीव व पक्षी वास्तव्यास आहेत. मुरूड शहरापासून 14 किमी अंतरावर फणसाड अभयारण्य असून निसर्गाच्या वनसंपदेने नटलेली वृक्षदाटी व औषधी वनस्पतींचा मोठा साठा येथे उपलब्ध आहे. सुमारे 54 किलोमीटर परिसरात याचे क्षेत्र व्याप्त असून पर्यटकांना हे अभयारण्य नेहमी लुभावत असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.

फणसाड अभयारण्याच्या आजूबाजूस अलिबाग व रोहा तालुक्यांतील रस्त्यालगतचे क्षेत्र येते. पावसामुळे रस्त्यालगत असणार्‍या क्षेत्रात मोठे गवत अथवा झाडेझुडपे उगवतात व कडक उन्हात सुकून जातात. फणसाड अभयारण्याचे क्षेत्र रस्त्यालगत असल्याने एखादा व्यक्ती विडी-सिगारेट पेटवण्यासाठी माचिसची काडी पेटवून ती तशीच गवतात फेकतो. परिणामी काही तासांत हळूहळू संपूर्ण जंगलाला आग लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.

याबाबत अधिक माहिती देताना फणसाड अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी सांगितले की, अभयारण्याच्या बाह्य व मालकी क्षेत्रात रस्त्यालगत असणारा सुके गवत घातक ठरते. विडी-सिगारेटसाठी पेटवलेली माचिसची काडी तशीच टाकल्याने जंगलाला धोका निर्माण होतो. अशा वेळी जंगले आबाधित ठेवण्यासाठी जळीत रेषा काढली जाते. रस्त्यालगत असणारे गवत जाळले जाते. प्रत्येक बिटाचे वनरक्षक कर्मचारी वृंदाकडून काम करून घेत आहेत. सतत दोन वर्षे अभयारण्य क्षेत्र वणवामुक्त असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply