Breaking News

पाच तासांत 5555 जोर; पेणच्या अजय पाटीलचा विक्रम

पेण ः प्रतिनिधी

हनुमान व्यायामशाळा पेण व श्री फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमध्ये जोर (हिंदू पुशअप) मारण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पेण तालुक्यातील बळवळी येथील 26 वर्षीय अजय कमलाकर पाटील या तरुणाने पाच तासांत 5555 जोर काढून विक्रम प्रस्तापित केला आहे.

रविवारी (दि. 7) सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी त्याने जोर मारण्यास सुरुवात केली. यादरम्यान गावातील सहकारी मित्रांनी त्याला प्रोत्साहन देत त्याच्याबरोबर जोर मारण्यास सुरुवात केली. एक, दोन, तीन हजारांचा आकडा पार करीत दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी त्याने पाच तासांत 5555 जोर मारून एक नवा विक्रम रचला. सूर्यनमस्कार प्रशिक्षक डॉ. अशोक भोईर यांच्या परीक्षणाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

या वेळी हनुमान व्यायामशाळेचे प्रशिक्षक राजेश अनगत, दशरथ भोपतराव, कुस्तीगीर संघाचे दत्ता पाटील, हरिश्चंद्र शिंदे, दीपक सोनावणे उपस्थित होते. डॉ. अशोक भोईर यांनी अजय पाटील यास रोख पाच हजार 555 रुपये तसेच हरिश्चंद्र शिंदे यांनी ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला. या वेळी अजय पाटील म्हणाला की, आपले आईवडील व नरेंद्र माऊली यांच्या कृपाशीर्वादाने आज मी हे ध्येय पूर्ण करू शकलो. सूर्यनमस्काराचे गुरुवर्य डॉ. अशोक भोईर, प्रशिक्षक राजेश अनगत, भोपतराव महाराज तसेच माझ्या सहकार्‍यांच्या प्रोत्साहनामुळे ही स्पर्धा मी यशस्वीपणे पार करू शकलो. मागील पाच वर्षांपासून मी सराव करीत असून, दररोज सात किमी धावणे, जोर मारणे असा नित्यक्रम असतो. आपल्या बळवली गावाचे नाव देशात कीर्तिमान करण्याचा मानस असल्याचेही त्याने शेवटी सांगितले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply