खालापूर : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गोपीनाथ कृष्णा जाधव (वय 52, रा. आंबिवली-माजगाव) आणि त्यांची पत्नी मनीषा यांना राजकीय वादातून मारहाण करण्याची घटना घडली. याबाबत सरपंच गोपीनाथ जाधव यांनी मारहाण करणारे भगवान राघो जाधव (रा. लोहप), अरुण गोविंद जाधव, ज्ञानेश्वर दत्तात्रय जाधव व रमेश भाऊराव जाधव (सर्व रा. आंबिवली) यांच्याविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
माजगाव ग्रामपंचायतीवर गोपीनाथ जाधव थेट सरपंच म्हणून निवडून आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून उपसरपंचपदावरून वाद सुरू असून, प्रकरण पंचायत समिती आणि पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. उपसरपंचपदाच्या निवडणुकीला तहसीलदारांनी स्थगिती दिली होती. निवडणूक स्थगिती आणि सरपंच गोपीनाथ जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची बातमी स्थानिक युट्यूबवर प्रसारित झाल्यानंतर चौघांनी जाणीवपूर्वक ती बातमी गोपीनाथ जाधव यांच्यासमोर लावून त्यांना डिवचण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रकरण तापून भगवान जाधव, अरुण जाधव, ज्ञानेश्वर जाधव व रमेश जाधव यांनी सरपंच गोपीनाथ यांना लाथाने व हाताबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली. हा प्रकार गोपीनाथ यांची पत्नी मनीषा यांनी पाहिल्यानंतर त्या भांडण सोडवण्याकरिता मध्ये गेल्या असता, भगवान जाधव याने मनीषा यांच्या उजव्या हातावर काठीने मारहाण केली. मनीषा खाली पडल्या असता त्यांना लाथांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत मनीषा यांच्या गळयातील सोन्याचे सर तुटून पडून गहाळ झाले आहे तसेच गोपीनाथ जाधवदेखील जखमी झाले. याबाबत गोपीनाथ जाधव यांनी खालापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार दिली असून, पोलिसांनी भा.दं.वि.कलम 324, 323, 504, 506, 427, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नाईक अमित सावंत अधिक तपास करीत आहेत.