चेन्नई : वृत्तसंस्था
इंग्लंड संघाने चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 227 धावांनी पराभव करीत दौर्याला दणक्यात सुरुवात केली. पहिल्या सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्या सामन्यात झालेल्या चुका आम्ही सुधारू व पुढील सामन्यात आम्ही सर्वस्वी झोकून देऊन सर्वोत्तम कामगिरी करू, असे म्हटले आहे.
विराट म्हणाला, आम्हाला पुनरागमन करता येते. पुढील सामन्यात मोठ्या भागीदार्या करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी सकारात्मकतेने सुरुवात करून इंग्लंडवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करावा लागेल.
‘578 धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात निराशाजनक फलंदाजीमुळे सामन्याचे पारडे इंग्लंडकडे झुकले. खराब फलंदाजीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. एका फलंदाजानेही शतक केले असते, तरी आम्हाला झुंजीची संधी मिळाली असती, मात्र पहिल्या डावात इंग्लंडला मोठी आघाडी मिळाली व त्याचा आम्हाला फटका बसला,’ असे कोहली म्हणाला.
‘एकच कसोटी सामना झाल्यामुळे राहणेच्या खराब कामगिरीवर न बोललेले बरे. पहिल्या डावात अजिंक्य चौकार मारण्याचा प्रयत्न करीत होता. जो रूटने उत्कृष्ट झेल पकडला. रहाणेने पहिल्या डावात धावा केल्या असत्या तर हे बोलणे झाले नसते. पुढील सामन्यावर लक्ष देण्याची गरज आहे. एक कसोटी संघ म्हणून आम्हाला उत्कृष्ट प्रदर्शन करावे लागेल,’ असेही कोहली म्हणाला.
…म्हणून नदीमला संधी
कुलदीप यादवला संधी न देण्याविषयी कोहली म्हणाला, आम्ही दोन ऑफस्पिनर्सना संघात स्थान दिले होते. कुलदीप चायनामन गोलंदाज असल्याने त्याचा चेंडूही उजव्या हाताने फलंदाजी करणार्या फलंदाजासाठी आत येतो. गोलंदाजीत विविधता असावी म्हणून आम्ही कुलदीपच्या जागी नदीमला संघात घेतले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …