भाजपकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड
मुंबई ः प्रतिनिधी
ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वादाचा नवा अंक गुरुवारी (दि. 11) समोर आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडला जाण्यासाठी सरकारी विमानाने निघाले होते, मात्र राज्यपालांना सरकारी विमानाने प्रवास करण्यास ठाकरे सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे विमानात बसलेले राज्यपाल खाली उतरून खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. यावरून भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविली आहे, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणी तांत्रिक कारणामुळे परवानगी नाकारल्याची सारवासारव केली आहे.
मीडियामध्ये ही बाब समोर आल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. त्यानंतर आता राज्यपालांच्या कार्यालयाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचे कळविले, असे राज्यपाल कार्यालयाने म्हटले आहे. राज्यपाल कार्यालयाने याबाबत परिपत्रक काढले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देहरादूनला जाणार होते. देहरादूनला जाण्यासाठी राज्यपाल मुंबई विमानतळावर पोहचले असता उड्डाणाची परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यपालांना पुन्हा परतावे लागले. दरम्यान, यावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत.
फडणवीसांची टीका
हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रात याआधी असे कधीच घडले नाही. राज्यपाल ही व्यक्ती नसून पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. राज्यपाल हेच राज्याचे प्रमुख असतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नेमतात, असे आपल्या संविधानाने सांगितले आहे. राज्यपालांना राज्य सरकारचे विमान वापरायचे असेल, तर जीएडीला एक पत्र पाठवावे लागतं आणि नंतर परवानगी मिळते अशी पद्धत आहे. माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारे पूर्ण कार्यक्रम जीएडीला गेला. मुख्य सचिवांना याची माहिती होती. फाइलही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचली आहे, पण जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांना विमानातून उतरावे लागले हा पोरखेळ आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
राज्य सरकारने माफी मागावी -मुनगंटीवार
राज्यपालांना विमानातून उतरवण्यात आले. आता जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्यपालांची राज्य सरकारने माफी मागावी, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी
केली. राज्यपालांचे विमान सरकारच्या माध्यमातून नाकारले असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणे योग्य नाही. सरकारकडून असे घडले असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकार्याकडून घडले असेल, तर त्याला तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील जनताच सरकारची घमेंड उतरवेल ः आशिष शेलार
योग्य परवानगी घेऊन राज्यपाल राजभवनावरून ठरलेल्या प्रवासाला विमानतळावर गेले. विमानतळावर विमानात गेल्यानंतर त्यांना उतरवले गेले. आज महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवलेय. आता महाराष्ट्रातील जनताच या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल, असा आशिष शेलार यांनी व्यक्त केला. याचबरोबर राज्यपाल हे संविधानिक राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्याशी हे सरकार असे वागत असेल तर अन्य लोकं कशी व्यवस्था ठेवणार? राज्यभर अव्यवस्था निर्माण करायची. कुठलीही व्यवस्था योग्य रीतीने चालू द्यायचीच नाही अशा पद्धतीचा कारभार पहिल्या दिवसापासून ठाकरे सरकार करीत आहे, असेही आशिष शेलार म्हणाले.