पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर (बुद्रुक) ग्रामपंचायतीने वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची लेखी विनंती करूनही महावितरणने ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धेश्वर आणि खांडसई गावातील मराठी शाळांची वीज जोडण्या तोडण्याची तत्परता दाखविली.
कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांचे अर्थचक्र कोलमडून पडले आहे. मात्र महावितरणच्या वाढीव वीजबिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. सध्या वीज देयके न दिलेल्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे. याला मराठी शाळादेखील अपवाद राहिलेल्या नाहीत. ग्रामिण भागातील प्राथमिक शाळांची वीज बिले भरण्याची जबाबदारी संबंधीत ग्रामपंचायतची असते. त्याची व्यवस्था 15व्या वित्त आयोगात केली आहे.
मात्र यामध्ये सध्या ऑनलाईन पेमेंटची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे सिद्धेश्वर व खांडसई गावांतील प्राथमिक शाळांचे बिल भरण्यासाठी काही दिवसांची मुदत द्यावी, असे निवेदन सिद्धेश्वर (बुद्रुक) ग्रुपग्रामपंचायतीने महावितरणच्या पाली कार्यलयाला गुरुवारी (दि. 4) दिले होते.
तरीसुद्धा या शाळांच्या वीज जोडण्या तोडण्याची तत्परता महावितरणने दाखविली.
दरम्यान, या संदर्भात सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार व मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांच्या मध्यस्थीनंतर महावितरणने गुरुवारी (दि. 11) सिद्धेश्वर शाळेचा वीज पुरवठा पुन्हा सुरू केला आहे.
काही तांत्रिक कारणांमुळे सिध्देश्वर व खांडसई येथील शाळांचे वीज बिल भरता आले नाही. ग्रामीण भागातील शाळा, आरोग्य केंद्र, पाणी पुरवठा योजना यांचे वीज बिल माफ करता येत नसेल तर ते भरण्यासाठी राज्य शासनाने मुदत द्यावी.
-उमेश यादव, सरपंच, सिध्देश्वर (बुद्रुक), ता. सुधागड
गेल्या एप्रिलपासून ज्यांनी बील भरलेले नाही, त्यांचे वीज कनेक्शन ताबडतोब तोडण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून आले आहेत. तालुक्यात असे जवळपास 82 ग्राहक आहेत. त्यामध्ये सिध्देश्वर व खांडसई येथील शाळांचे नाव होते. त्यामुळे त्या शाळांचे वीज कनेक्शन तोडले होते. मात्र त्यांना आता 10 दिवसांची मुदतवाढ देऊन पुन्हा कनेक्शन जोडले आहे.
-जतीन पाटील, कार्यकारी उपअभियंता, महावितरण, पाली उपविभाग