Breaking News

‘नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 लाख पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवा’

ठाणे : प्रतिनिधी

नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील विविध पक्षाचे नेते सामाजिक संघटना प्रकल्पग्रस्त शेतकरी जनता गेली काही वर्षे मागणी करीत आहेत, त्यासाठी त्यांनी राज्य व केंद्र सरकारकडे पत्रव्यवहारही केला आहे. आता ही मागणी लावून धरण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड या भागातून 10 लाख पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवा, असे आवाहन भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी येथे केले. नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते ‘दिबां’चेे नाव देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबई, मुंबई, ठाणे रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक कळवा येथील अमित गार्डन येथे नुकतीच झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार कपिल पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ही मागणी आत्ताची नव्हे तर नवी मुंबई विमानतळ निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळीपासून करण्यात आली आहे. आता या मागणीसाठी लोक चळवळ उभी करून गावागावात जागृती करणे गरजेचे आहे. अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, उद्योजक जे. एम. म्हात्रे, कामगार नेते सुरेश ठाकूर, अखिल आगरी समाज परिषदेचे कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल, आगरी कोळी फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. भारद्वाज चौधरी, मुंबई स्थानिक आगरी समाजाचे उपाध्यक्ष अनिल ठाकूर, माजी नगरसेवक हिरा पाटील, मनोहर पाटील, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी परिषदेचे सरचिटणीस दीपक म्हात्रे यांनी या बैठकीमागील भूमिका स्पष्ट केली. परिषदेचे कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल यांनी प्रास्ताविकात यासंबंधी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या वेळी अन्य उपस्थित वक्त्यांनी मनोगत व्यक्त करून लोकनेते दि. बा. पाटील यांच्याच नावाची मागणी केली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply