भाजपचे मिरेंद्र शहारे यांची सिडकोकडे मागणी
करंजाडे ः रामप्रहर वृत्त
करंजाडेमधील प्रलंबित कामे जसे रस्ते, गार्डन, गटारे तसेच सेक्टर 1 ते 3मधील गटार प्रश्नाबाबत करंजाडे भाजप शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे यांनी नुकतीच सिडको अधिकारी श्री. मुलानी तसेच पटेल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी प्रामुख्याने रस्ते, गार्डन व शहरातील विविध भागांतील गटार यंत्रणा याबाबत सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.
रस्त्याच्या कामाची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे दोन मंजूर गार्डनपैकी एका गार्डनच्या कामास मंजुरी मिळाली. त्यावरसुद्धा लवकरच काम सुरू होईल, तर दुसर्या गार्डनच्या कामास कार्यालयीन प्रक्रियेमुळे विलंब होत असल्याची माहिती या वेळी मिळाली. संपूर्ण शहरातील गटार यंत्रणेसाठी मोठे वार्षिक कंत्राट निघाले असून समस्याग्रस्त भागात त्यावर काम सुरू आहे.
सेक्टर 1 ते 3मध्ये निर्माण झालेल्या गटार समस्येवर तोडगा काढण्यासाठी या वेळी संबंधितांना विशेष विनंती करण्यात आली. त्यावर मागील नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराने अर्धवट काम सोडून गेल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याची माहिती मिळाली. त्यावर पुढील आठवड्यात सिडको अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच इतर सिडको अधिकारी समस्याग्रस्त भागाची पाहणी करून लवकरच प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल, अशी ग्वाही या वेळी देण्यात आली.