रोहा प्रांताधिकार्यांची एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सूचना
रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील 26गाव पाणी पुरवठा योजनेतून सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी संबंधीत गावांतील ग्रामस्थांनी शासनाकडे निवेदन दिले आहे. या अनुषंगाने रोहा प्रांत अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी गुरुवारी (दि. 11) प्रांत कार्यालयात एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती यांचे अधिकारी व संबंधीत गावातील प्रमुख ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती.
26गाव पाणीपुरवठा योजनेतून सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी एमआयडीसी आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी एकत्र येवून प्रयत्न करावेत, अशा सूचना प्रांताधिकारी डॉ. माने यांनी या बैठकीत दिल्या.
सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने 26गाव पाणीपुरवठा योजने अंतर्गत येत असलेल्या गावांना पाणीटंचाई भासत आहे. या योजनेतील शेवटच्या गावापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी शासनाला सातत्याने तक्रारी व निवेदने दिली आहेत. त्या अनुषंगाने प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी गुरुवारी संबंधीताची बैठक बोलावली होती. तहसीलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी पंडित राठोड, हेमंतराव देशमुख, निडी तर्फे अष्टमीच्या सरपंच स्वामिनी डोलकर, उपसरपंच उत्तम नाईक, सदस्य अजित पोकळे, शेणवईच्या सरपंच प्रगती देशमुख, मोतीराम गीजे, नवनीत डोलकर, संदेश डोलकर, तसेच संतोष खेरटकर, सचिन चोरगे आदींसह या परिसरातील ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते.
या योजनेतील काही पाणी साठवण टाक्यांमध्ये साचलेला गाळ काढावा, पाणी गळती थांबवावी, अशा मागण्या ग्रामस्थांनी बैठकीत केल्या. या योजनेचे पाणी पडम येथे येईपर्यंत कमी होत असून, ते मधल्या भागात कुठे मुरते, याचा शोध जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी घ्यावा, अनाधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई करावी, असे प्रांताधिकारी डॉ. माने यांनी या वेळी सुचविले.