फसवणुकीचा गुन्हा दाखल
महाड : प्रतिनिधी
महाड शहरामधील घरात एकटीच असलेल्या वृद्ध महिलेला करणी दूर करतो सांगून तिच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी दोन वासुदेवांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पहाटे लोकांना आपल्या मधुर वाणीने जागे करणार्या वासुदेवांवर पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे.
महाड शहरातील तांबड भुवन परिसरात शुक्रवारी (दि. 12) रोजी दोन वासुदेवांनी फिर्यादी दीपक रामचंद्र पवार यांची सासू प्रज्ञा प्रफुल्ल गुरव या घरात एकट्या असल्याचे पाहून प्रवेश करीत त्यांचा विश्वास संपादन केला. वासुदेवांनी प्रज्ञा गुरव यांना तुमच्यावर करणी केली असल्याचे सांगून फसवणूक करीत 3600 रुपये उकळले. हा प्रकार प्रज्ञा यांचे जावई दीपक पवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार महाड पोलिसांनी शहरात फिरणार्या दोन वासुदेवांना ताब्यात घेतले. लखन अशोक गोंड (वय 35), ज्ञानेश्वर कचरू गंगावणे (वय 32, रा. दोघेही बारामती) अशी या वासुदेवांची नावे असून, त्यांच्यावर भा.दं.वि. कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांकडे 43,705 रुपये आढळून आले आहेत.
प्रज्ञा यांच्यासह इतर साक्षीदारांचीदेखील फसवणूक झाल्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सांगून, ज्यांची ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.