नागोठणे ः प्रतिनिधी
इमारतीसमोर उभी केलेल्या हुंडाई कंपनीच्या ओरा या आलिशान कारची मागील काच अज्ञाताने फोडल्याची घटना रविवारी मध्यरात्री शहरात घडली. येथील प्रभूआळीत राहणारे देवानंद पिंगळे हे रात्री उशिरा आपली कार श्री कृपा हौसिंग सोसायटीसमोरील रस्त्याच्या बाजूला उभी करून आपल्या घरी निघून गेले होते. पहाटेच्या दरम्यान ते इमारतीमधून उतरून खाली आले असता त्यांना आपल्या गाडीची काच वजनदार साहित्याने फोडल्याचे निदर्शनास आले.
ते तातडीने तक्रार देण्यासाठी येथील पोलीस ठाण्यात गेले असता तुमची कामे उरकून दुपारी या, असे त्यांना सांगण्यात आले. दरम्यान, पिंगळे यांचा दोनच दिवसांपूर्वी एका वाहनचालकाबरोबर गाडी लावण्यावरून येथे वाद झाला होता. त्यानेच हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.