Breaking News

रायगडात अपघातांचे प्रमाण घटले

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण घटले आहे. टाळेबंदी (लॉकडाऊन) आणि त्यामुळे वाहतुकीवर घातले गेलेले निर्बंध यास कारणीभूत ठरले आहेत. जिल्ह्यात वर्षभरात 599 अपघातांची नोंद झाली आहे. हे प्रमाण 2019च्या तुलनेत चाळीस टक्क्यांनी कमी आहे. रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असे तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. वाहनांची संख्या जास्त असल्याने महामार्गावर अपघातांचे प्रमाण अधिक असते. दरवर्षी सरासरी एक हजार अपघातांची नोंद होते. यात सरासरी अडीचशे ते तीनशे लोकांचा मृत्यू होतो, तर सातशे ते आठशे जण जखमी होत असतात, मात्र गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात 2020मध्ये 599 अपघातांची नोंद झाली असून, यात 204 जणांचा मृत्यू, तर 404 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू करण्यात आली. वाहतुकीवर निर्बंध आणले गेले. त्यामुळे अपघातांचे प्रमाण या कालावधीत घटले.

मागील काही वर्षांतील

अपघातांची आकडेवारी

वर्ष   अपघात    मृत जखमी

2014      1,261     328 730

2015      1,423     357 855

2016      1,151     254 874

2017      1,010     257 669

2018      1,098     302 732

2019      991      216 613

2020      599       204 404

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी दोन पातळ्यांवर आम्ही काम केले. एकीकडे बेदरकार वाहनांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवली, तर दुसरीकडे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमनाबाबत जनजागृती केली. यामुळे गेल्या दोन वर्षांत रस्ते अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. काही प्रमाणात टाळेबंदीमुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.

-रवींद्र शिंदे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा रायगड

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply