Breaking News

अखेर शेतकर्यांचा मार्ग झाला मोकळा; भिवपुरी रोड स्टेशनबाहेरील रेलिंग काढली; पाण्याची वाटही खुली

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेर कर्जत दिशेला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते, ते  पाणी वाहून नेणारी मार्गिका सोमवारी (दि. 17) खुली करण्यात आली. तसेच लोखंडी रेलिंग लावून अडविण्यात आलेला शेतकर्‍यांचा रस्तादेखील  मोकळा करण्यात आला.

गेली दोन वर्षे पावसाळ्यात भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेर कर्जत दिशेकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत होते. त्याबाबत स्थानिक रेल्वे प्रवासी संघटना आणि डिकसळ ग्रामस्थांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. याच भागात राहणारे मनसेच्या रेल्वे युनिटचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना त्याबाबत निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार पाटील यांनी रेल्वे अधिकार्‍यांना घटनास्थळी आणून पाहणी केली होती. त्यावेळी पाणी वाहून जाणारी वाट याच भागात गृहप्रकल्प बांधणार्‍या व्यावसायिकांनी निमुळती केली असल्याचे आढळले.ही बाब ध्यानात घेऊन मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आणि सोमवारी (दि. 17) मध्य रेल्वेच्या टीमने पावसाचे पाणी वाहून नेणारी वाट मोकळी करण्याचे काम केले.

मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी पादचार्‍यांनी रूळ ओलांडू नये, यासाठी भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेर कर्जत दिशेकडे  लोखंडी रेलिंग लावली होती. त्या रेलिंगमुळे डिकसळ आणि गारपोली गावातील शेतकर्‍यांना आपल्या रेल्वेमार्गा पलिकडील शेतात जनावरे व अवजारे घेऊन जाता येत नव्हते. त्याबद्दल  बाळू भासे यांनी 60 शेतकर्‍यांच्या सह्यांचे निवेदन मध्य रेल्वेला दिले होते. त्याची दखल घेवून मध्य रेल्वे प्रशासनाने लावलेली लोखंडी रेलिंगदेखील सोमवारी काढून टाकली. त्यामुळे या दोन्ही गावातील 60 हुन अधिक शेतकर्‍यांना आता त्यांच्या शेतात सहज जाता येणार आहे.  कर्जत रेल सुरक्षा दलाचे अधिकारी शर्मा, कामगार युनियनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, ग्रामस्थ संदिप पाटील, पप्पू सावंत, जिवक गायकवाड, बाळू भासे, चिंतामण पाटील, गजानन पाटील, दिलीप पाटील, शंकर बुंधाटे, शाम पाटील, अमर पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, विनायक पाटील, उमरोली ग्रामपंचायत सदस्य तेजस भासे, प्रसाद भासे, भास्कर लोंगले, प्रवासी संघटनेचे  अध्यक्ष किशोर गायकवाड, प्रतिनिधी अमर साळोखे, पुरुषोत्तम पाटील, जगन्नाथ भासे, सागर शेळके यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संंख्येने उपस्थित होते.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply