Breaking News

आंबेडकरी चळवळीची परंपरा लाभलेले कर्जत

मुंबईपासूनजवळ असलेल्या कर्जत तालुक्यात आंबेडकरी चळवळ प्रचंड वेगाने पसरली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार-विचार कर्जत तालुक्यातील बौद्ध समाजातील तरुणांनी तात्काळ आत्मसात केले. नागपूरमध्ये धम्माची दीक्षा घेताना डॉ. बाबासाहेब यांच्यासमवेत कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते होते. कर्जत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीमध्ये प्रसिद्धीपासून लांब राहून आजही काम करीत आहेत. भारतीय बौद्ध महासभामध्ये धर्माचे काम करणारे यांची एक साखळी तयार असून ही परंपरा यापुढेदेखील कायम राहील, असे कार्य कर्जत तालुक्याच्या 85 गावात गावात अखंडपणे सुरु आहे. कर्जत तालुक्यात बौद्ध समाजाची अखंड वस्ती असलेले एकही गाव नाही, पण तालुक्यातील 85 गावांमध्ये हा समाज गुण्यागोविंदाने राहत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडले, त्या मुंबई महानगरपासून कर्जत तालुका दोन तासांच्या अंतरावर असल्याने या तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते बाबासाहेबांच्या संपर्कात होते. त्यातील काही तरुणांनी धम्माची दीक्षा घेतानादेखील बाबासाहेबांना साथ दिली होती.  देश स्वतंत्र झाल्यानंतर 1956 मध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना झाली आणि त्या संघटनेत बौद्ध धर्माचे काम करण्यासाठी कर्जत तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईतून माहिती घेऊन कर्जत तालुक्यातील 85 गावात पोहचविण्याचे काम या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्या काळात केले. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आणि अत्यंत गरीब असलेल्या बौद्ध समाजातील कुटुंबावर एखादे संकट आले की, समाजातील सर्व कार्यकर्ते आपल्यापरीने आर्थिक आणि शारीरिक मदत पोहचवायचे. त्यामुळे महासभेच्या माध्यमातून सुरु असलेले काम पाहून बौद्ध समाजातील सर्व लोकांमध्ये धर्माचे कार्य करणार्‍या या संघटनेबाबत चांगले मत निर्माण होऊ लागले. कर्जत तालुक्यात आंबेडकरी चळवळी काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 31 डिसेंबर 1978 ला कर्जत तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेची स्थापना झाली. कडाव येथे झालेल्या स्थापना सभेत मीराबाई आंबेडकर यांनी तालुक्याचे अध्यक्ष म्हणून कर्जत गुंडगे येथील वसंत धर्मा सुर्वे यांची तर सचिव म्हणून खांडसचे बी. आर. जाधव यांची आणि कोषाध्यक्ष म्हणून जी. एस. सदावर्ते यांची निवड जाहीर केली. तालुक्यातील 85 गावांमध्ये काम करणारी ही कमिटी धर्माचे काम करण्यासाठी गावोगावी फिरू लागली. अशोक गवळे (नेरळ), मधुकर धनवटे (आर्डे), हिरामण अभंगे (भडवल), पी. दि. गायकवाड (नेरळ), मालू गायकवाड (वडवली), काशिनाथ गायकवाड (एकसल) तसेच पी. दि. कदम, एच. आर. जाधव, मोरू जाधव, हरिभाऊ हिरे, काशिनाथ गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, रामचंद्र जाधव, वाळकू जाधव यांनी एकत्र येत महासंघाचे काम सुरु केले. कालांतराने तालुक्यात भारतीय बौद्ध महासंघाचे कार्य वाढत गेले. त्यामुळे कर्जत तालुक्याचे धर्माचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे दोन विभागात काम सुरु झाले. त्यात मधुकर धनवटे, बापू कनोजे, पी. दि. गायकवाड यांनी नेरळची जबाबदारी घेतली तर कर्जत परिसरात मारुती खडगळे, धोंडू गायकवाड, मोरोबा जाधव आणि वसंत मामा सुर्वे यांनी जबाबदारी घेऊन काम सुरु केले. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात आंबेडकरी विचार पोहचवण्याबरोबर आंबेडकरी आचरणाप्रमाणे सामाजिक कामे सुरु होती. मात्र हे विचार अधिक लोकांपर्यंत पोहचावे यासाठी याच कार्यकर्त्यांनी  कर्जतच्या अभिनव शाळेत युगपुरुष हे नाटक सादर केले आणि गाजवलेदेखील होते. अशी नाटके आणि कव्वालीच्या माध्यमातून धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गावोगावी होऊ लागले. तालुक्यात त्यावेळी पक्षीय राजकारण नव्हते, मात्र भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा गावोगावी उभारल्या जाऊ लागल्या होत्या. त्यातून धर्माचा प्रसार करतानाच धर्माच्या प्रसारासाठी बौद्ध विहार असायला हवेत अशी मागणी पुढे येऊ लागली आणि आज तालुक्यात अनेक ठिकाणी बौद्ध विहार आणि बौद्ध समाज मंदिरे उभी राहिली आहेत. त्यात कडाव, डिकसळ, किरवली, नेरळ, गुंडगे, दहिवली, कर्जत बुद्धनगर, कशेळे येथून कार्य सुरु आहे. मात्र तालुक्यात भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे राहिलेले नाही, ही खंत अनेकांना आहे. कर्जत तालुक्यात या समाजाचे अनेक गीतकार, गायक, कवी, साहित्यिक जन्माला आले आहेत.साहित्यिक लक्ष्मण अभंगे, गायक हिरामण अभंगे, अशोक अभंगे, किसान साळवी, दत्ताजी साळवी तर कवी म्हणून चंद्रकांत पवार, गोपीनाथ ओव्हाळ यांचे कार्य महत्त्वाचे आहे. या सर्वांचे कार्य आणि भारतीय बौद्ध महासभेच्या  वाटचालीबद्दलची माहिती प्रकाशित झालेले नाही, ती माहिती भविष्यात प्रसिध्द व्हायला हवी, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने काहींनी व्यक्त केले आहे.

-संतोष पेरणे

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply