पनवेल : बातमीदार
क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करतो करून देतो असे सांगून उसरली खुर्द, पनवेल येथील 44 वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून 74 हजार 499 रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उसरली खुर्द येथील संतोष हनुमान भगत हे तळोजा एमआयडीसी येथील कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांनी एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले होते. परंतु त्यांनी ते कार्ड ऍक्टिव्हेट केले नव्हते. 30 सप्टेंबर रोजी त्यांना पवनकुमार चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीने फोन केला. आणि तो एसबीआय बँकेतून बोलत असून क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करण्यासाठी ओटीपी नंबर सांगा असे त्याने भगत याना सांगितले.
या वेळी त्यांनी चतुर्वेदी यास मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर सांगितला असता त्यांच्या क्रेडिट कार्डमधून सलग चार वेळा ट्रांजेक्शन झाले. आणि 74 हजार 499 रुपये डेबिट झाले. या वेळी फसवणूक झाली असल्याचे भगत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पवन कुमार चतुर्वेदी नावाच्या ईसमाविरोधात गुन्हा दाखल केला.