Breaking News

पनवेल महापालिकेकडून माजी सैनिकांना मालमत्ता करातील सामान्य करातून शंभर टक्के सूट

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मागणीला यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजनेतंर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणार्‍या सर्व माजी सैनिकांना व त्यांच्या विधवा पत्नींना सामान्य करातून शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी सुधारित आदेश काढून घेतला आहे. यासाठी माजी सभागृह नेते परेश ठाकूर व सहकार्‍यांनी नुकतीच आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले होते.
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय अन्वये पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वास्तव्य करणार्‍या सर्व माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला कर माफी योजना या योजनेंतर्गत एका मालमत्तेचा मालमत्ता कराच्या सामान्य करात 100 टक्के सूट देण्यात येणार आहे. ही सवलत 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.
यापूर्वी माजी सैनिकांना सामान्य करामध्ये आठ टक्के सवलत होती. माजी सैनिकांना 1 एप्रिल 2023पासून सामान्य कर पूर्ण माफ करण्यात येत आहे. ज्या माजी सैनिकांनी 1 एप्रिल 2023 ते 1 ऑगस्ट 2023दरम्यान मालमत्ता कर भरणा केला आहे त्यांची सामान्य करात भरणा केलेली रक्कम पुढील वर्षाच्या मालमत्ता कराच्या बिलामध्ये समायोजित करण्यात येईल.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रभाग अ खारघर येथे 11 सप्टेंबर, प्रभाग ब कळंबोली येथे 12 सप्टेंबर, प्रभाग क कामोठे येथे 13 सप्टेंबर, प्रभाग ड पनवेल येथे 14 सप्टेंबर रोजी 11 ते 2 या वेळेत माजी सैनिकांनी आपले अर्ज दाखल करावे, असे आवाहन मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गणेश शेटे यांनी केले आहे.

योजनेचे लाभार्थी होण्यासाठी खालील
अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
1) माजी सैनिक महाराष्ट्र राज्यात जन्मलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्याचा किमान 15 वर्ष सलग रहिवासी असावा. त्याकरिता त्याने सक्षम प्राधिकार्‍याकडून अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
2) करमाफीस पात्र ठरणार्‍या व्यक्तीने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकार्‍यांकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
3) करमाफीस पात्र व्यक्ती राज्यातील एकाच मालमत्तेकरिता करमाफीस पात्र राहतील. तसे घोषणापत्र त्यांनी संबंधित जिल्हा सैनिक कल्याण अधिकार्‍यांना सादर करणे आवश्यक राहील.
4) या योजनेचा लाभ संबंधित माजी सैनिक आणि सैनिक पत्नी/ विधवा हयात असेपर्यंतच देय राहील तसेच अविवाहित शहीद सैनिकांच्या बाबतीत त्यांचे आई-वडील हयात असेपर्यंत हे लाभ देय राहतील.
5) या योजनेसाठी माजी सैनिक याचा अर्थ माजी सैनिक (केंद्रीय नागरी सेवा व पदांवर पुर्ननियुक्ती) सुधारणा नियम 2012मध्ये विहीत केलेल्याप्रमाणे राहिल.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply