भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला
पुणे : प्रतिनिधी
महाविकास आघाडीची सद्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती असे सांगितले. तर देशमुख म्हणतात की, त्यांना शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून मिळत होती व ते ती पुढे पाठवत होते. दुसरीकडे आयपीएस अधिकारी परमवीरसिंग यांनी सांगितले की, सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव आणला होता. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल, असेही पाटील म्हणाले.
पिंपरी चिंचवड व महाराष्ट्रात ज्याप्रकारे सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे तो आम्ही सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांचा सत्कार करून पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्हीही काही कमी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये खोट्या केसेस करून पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार, असा सवाल आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. पोलिसांनी निःपक्षपातीपणे चौकशी केली नाही तर आपण न्यायालयात जाऊ, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.