पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या देशातील सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 11) सायंकाळी केली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाउनसंबंधी सर्वांची मते जाणून घेतली. या वेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवला जावा अशी मागणी केल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य केली असून लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यास संमती दिली आहे.
पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे हे तर खरे आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत कारण मुंबई हे जगाचे प्रवेशद्वार आहे. आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत. जे रुग्ण आपल्याला सापडलेत त्याची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करीत आहे. मुंबईत रुग्णांची संख्या एक हजारांवर गेली आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.
राज्यातील कोरोना चाचण्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. सुमारे 33 हजार चाचण्या घेण्यात आल्या असून 1574 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत. 30 हजार 477 जणांचे निगेटिव्ह आहेत, तर 188 रुग्ण बरे करून घरी पाठवण्यात आले आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.
दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे ती संख्या वाढते आहे. ज्यांचे वय जास्त आहे त्यांचा धोका वाढतो आहे. ज्यांना आधीपासून काही विकार आहेत अशा रुग्णांवर कोरोनाचा गंभीर परिणाम होतो आहे. आकाश तर पांघरले आहे, पण झोप उडाली आहे सगळ्यांची अशी अवस्था आहे, असेही ठाकरे म्हणाले.