Breaking News

गुड न्यूज! कोव्हिशिल्डपाठोपाठ कोव्हॅक्सिन रायगडात दाखल

अलिबाग : प्रतिनिधी
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लशीपाठोपाठ भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन  ही कोरोना प्रतिबंधक लस रायगड जिल्ह्यात दाखल झाली आहे. जिल्ह्यात सध्या 19 केंद्रांवर प्रत्यक्ष लसीकरण सुरू असून, लसीकरणासाठी नोंदणी केलेल्यांपैकी 50 टक्क्यांहून कमी लोकांनी लसीकरण केले आहे, तर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणाचे प्रमाण 65 टक्के एवढे आहे.  
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 25 हजार 313 जणांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती. यातील 11 हजार 179 जणांनी प्रत्यक्ष लस घेतली आहे. म्हणजेच 50 टक्क्यांहून कमी लोकांनी लसीकरण केले. जिल्ह्यातील 11 हजार 568 आरोग्य कर्मचार्‍यांची कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती. यातील सात हजार 547 जणांनी लस घेतली. उर्वरित कर्मचारी लसीकरणाबाबत अजूनही साशंक असल्याचे दिसून येते.
लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात पोलीस, महसूल आणि शासकीय विभागातील कर्मचार्‍यांचे लसीकरण केले जात आहे. यासाठी जिल्ह्यात 13 हजार 745 फ्रण्टलाइन वर्कर्सनी नोंदणी केली आहे. यातील तीन हजार 632 जणांनी आतापर्यंत लस घेतली आहे. म्हणजेच पहिल्या फळीतील केवळ 26 टक्के कोरोना योद्ध्यांनी लसीकरण करून घेतले आहे.
जिल्ह्यात सध्या 19 केंद्रांवर प्रत्यक्ष लसीकरण सुरू आहे. यात प्रामुख्याने शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी कोव्हिशिल्डच्या 39 हजार कुप्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातून नोंदणी केलेल्या सर्व आरोग्य आणि पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांना लसीचे दोन डोस देणे शक्य होणार आहे, त्यामुळे लसीकरणासाठी पुरेसा लस साठा उपलब्ध असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोव्हिशिल्डपाठोपाठ कोव्हॅक्सिन लस रायगड जिल्ह्यात दाखल झाली आहे. जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सिनच्या नऊ हजार 100 कुप्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या केवळ जिल्हा रुग्णालयात हमीपत्र भरून घेतल्यावरच नोंदणीकृत कर्मचार्‍यांना ही लस दिली जाणार आहे.

जिल्ह्यात ज्या कर्मचार्‍यांनी कोरोनाची लस घेतली आहे, त्यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा तीव्र त्रास जाणवलेला नाही. अंगदुखी आणि सौम्य ताप सर्वसाधारण लक्षणे काही जणांमध्ये दिसून आली आहेत. त्यामुळे लशीला घाबरण्याचे कारण नाही. नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रण्टलाइन वर्कर्सनी लसीकरणासाठी पुढे यावे.
-डॉ. गजानन गुंजकर, लसीकरण मोहीम प्रमुख

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply