Breaking News

अतिवृष्टीमुळे शेतीलाही फटका

तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करून भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दरड कोसळल्यामुळे किंवा भूभाग खचल्यामुळे रस्ते बंद झाले असल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. ते रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याचेही आदेश दिल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. 9) येथे दिली.

रायगड जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पनवेल आणि उरण भागाचा दौरा केला. त्यांच्यासोबत सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रविशेठ पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड (पेण), विठ्ठल इनामदार (महाड), दत्तात्रेय नवले (पनवेल) आदी होते. यानंतर त्यांनी पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेऊन याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. या वेळी त्यांनी आपण पालघरमध्ये अडकल्याने इकडे लागलीच येऊ शकलो नाही, पण स्थानिक प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून माहिती घेऊन सूचना देत होतो, असे स्पष्ट केले.

महाड, पेण आणि पनवेलच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 90 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. दोन दिवसांत 100 टक्के पूर्ण होतील. त्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्याची माहिती दिल्यावर त्रुटी दूर केल्या जातील. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने शासकीय मदत दिली जाईल. महाड भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तेथील महाड-वरंध, पाचाड-निजामपूर आणि पोलादपूर-कोतवाल रस्ते बंद आहेत. त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपत्कालीन निधीतून करण्याचे आदेश पालकमंत्री चव्हाण यांनी दिले. पोलादपूर-कोतवाल रस्ता तातडीने करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी असमर्थता दाखवली. त्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी पर्यायी रस्ता नसल्याने त्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करण्याची मागणी केली.

पनवेलमध्ये मनुष्यहानीच्या नऊ घटना, 51 घरांची पडझड आणि 3175 घरांत पाणी शिरले होते. पनवेलच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे पूल आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सात कोटी रुपयांची गरज असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. उरणमध्ये 872 घरांत पाणी शिरले, तर 20 घरांची पडझड होऊन नुकसान झाले असून, 14 घरांना भरपाई दिली आहे. या वेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नवी मुंबई विमानतळाच्या कामामुळे पाणी साठले की नाही याबाबत माहिती घेऊन सल्लागाराच्या मदतीने भविष्यात पाणी साठू नये यासाठी उपाय करण्यात येतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

शासनाच्या नियमात बदल करण्याची गरज -आमदार प्रशांत ठाकूर

दोन दिवस पाणी थांबले, तरच शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाते, मात्र महाड, पनवेलमध्ये सलग दोनदा पाणी आल्याने मोेठे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई मिळण्यासाठी या नियमात बदल करण्याची गरज आहे, असे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. ते पुढे म्हणाले, पनवेलमध्ये पाणी शिरू नये म्हणून संरक्षक भिंत बांधण्याचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे, तर उरणमध्ये होल्डिंग पाँडचे गेट काढून टाकण्यात आले आहेत. होल्डिंग पाँडमध्ये असलेली मँग्रोस पर्यावरणवादींचा विरोध असल्याने काढता येत नाहीत. त्यामुळे गाळही काढता येत नाही. परिणामी पाणी तसेच राहते. अधिकारी वर्गाने लोकांच्या घराचे होत असलेल्या नुकसानीचा सर्व्हे करून अहवाल पाठवावा.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply