Breaking News

महाविकास आघाडीकडून जनता वेठीस

  • आमदार प्रशांत ठाकूर यांचा घणाघात
  • रूचिता लोंढे यांच्या विजयाचे आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने जनतेचा विश्वासघात करण्याचा उद्योग आरंभला आहे. पनवेलमध्येही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप व अन्य पक्षांनी महापालिकेची पोटनिवडणूक बिनविरोध न करता नागरिकांना वेठीस धरण्याचे ठरविले आहे. लोकांचे काहीही होवो, पण आम्ही निवडणूक लढविणार हे त्यांचे धोरण आहे. या नतद्रष्टांना येथील सुज्ञ जनता मतदानातून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते चौकसभेत बोलत होते.
पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील भाजप, रिपाइं युतीच्या तरुण, तडफदार व उच्चशिक्षित उमेदवार रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 5) विजय संकल्प बाइक रॅली काढण्यात आली होती. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयातून निघालेल्या या भव्य बाइक रॅलीस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर गावदेवी मंदिर येथे झालेल्या चौकसभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाविकास आघाडीच्या मुजोर कारभाराचा समाचार घेतला.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सर्वांच्या लाडक्या मुग्धाताई आपल्यातून अचानक निघून गेल्या. त्यानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकली असती. याआधी पनवेलसह महाराष्ट्रात घडलेल्या अशा प्रसंगात विविध पक्षांनी विशेषत: भाजपने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कर्जतमध्ये शेकापचे जि. प. सदस्य सुदाम पेमारे निवर्तले. त्या वेळी शेकापने आम्ही पेमारे कुटुंबातील उमेदवार देतो, तुम्ही सहकार्य करा, असे आवाहन केले होते.
त्यानुसार भाजपने उमेदवार उभा न करता सहकार्य केले. खोपोलीत शिवसेना नगरसेवक किसन शेलार यांचे निधन झाले. तेव्हा शिवसेनेने शेलार यांच्या घरातील सदस्याला उमेदवारी देतो, सहकार्य करा, अशी विनंती केली. या विनंतीला मान देत भाजपने तेथेही आपला उमेदवार दिला नाही. दुसरीकडे शेकापने उमेदवार उभा करून शब्द पाळला नाही. भाजपने दाखविलेली सूचिता इतर पक्षांनी पनवेलमध्ये दाखविणे अपेक्षित होते, मात्र जनतेला वेठीस धरण्याचा चंग महाविकास आघाडीने बांधला आहे. यांचे सरकार सत्तेवर आहे तोवर राज्यातील सर्वसामान्य जनतेचे काही खरे नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात आपल्या देशाचा आवाज बुलंद करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. राज्यात भलेही भाजपचे सरकार येऊ शकले नाही, पण सर्वसामान्य जनतेने जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्यासाठी आम्ही झटतोय. माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे जनतेच्या समस्या लावून धरत आहे. येथील मतदारांना आता ठरवायचे आहे तुमच्या हक्कासाठी, हितासाठी रस्त्यावर उतरून काम करणार्‍यांना साथ द्यायची की, आपल्याला वेठीस धरणार्‍यांच्या मागे जायचे असे सांगून अभ्यास करण्याची तयारी असलेल्या व पडेल ते कष्ट घेण्यासाठी सज्ज असणार्‍या रूचिता लोंढे यांना विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
महापौर डॉ. कविता चौतमोल, रिपाइं कोकण अध्यक्ष व नगरसेवक जगदिश गायकवाड, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, उमेदवार रूचिता लोंढे यांचीही समयोचित भाषणे झाली. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर विक्रांत पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, संतोष शेट्टी, नरेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, अ‍ॅड. मनोज भुजबळ, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, लीना गरड, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, विद्या गायकवाड, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, रिपाइंचे शहर अध्यक्ष किशोर गायकवाड, भाजप शहर सरचिटणीस अमरिश मोकल, प्रशांत झुंजारराव, चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदारांनो, जाब विचारा!
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात कर्नाळा बँक घोटाळ्याचा आवर्जून उल्लेख केला. चार वेळा आमदार राहिलेले कर्नाळा बँकेचे चेअरमन विवेक पाटील यांनी मी स्वत:ची प्रॉपर्टी विकेन, पण ठेवीदारांचा एकही रुपया बुडू देणार नाही, असे म्हटले होते. आता मात्र ते आमची बँक दुसरी कोणती तरी बँक घेईल तेव्हा आम्ही पैसे देऊ, असे सांगताहेत. हे लोक पैसे परत करू शकत नाहीत, पण निवडणुका लढवत आहेत. त्यांनी उरणची निवडणूक लढविली. आता ते शिवसेनेसोबत महापालिका पोटनिवडणूक लढवत आहेत. त्यांना मतदारांनी आमचे पैसे कधी परत करणार याचा जाब विचारला पाहिजे, असेही आमदार ठाकूर म्हणाले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply