मुंबई : प्रतिनिधी
प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाचा लिलाव सोमवार आणि मंगळवारी मुंबईत सुरू आहे. या हंगामात सर्व महत्त्वाच्या खेळाडूंना संघमालकांनी कायम न राखता नवीन खेळाडूंना संधी दिलेली आहे. यू मुम्बाकडून सहावा हंगाम गाजवणारा सिद्धार्थ देसाईही यंदाच्या हंगामात पुन्हा लिलावात उतरणार आहे. यू मुम्बाने यंदा सिद्धार्थला कायम राखण्यात कोणतंही स्वारस्य दाखवलेलं नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात सिद्धार्थवर सर्व संघमालकांनी नजर असेल यात काही शंका नाही. लिलावाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत जयपूर पिंक पँथर्सचा मालक अभिषेक बच्चन याने याबद्दलचे सूतोवाचही केले.
सिद्धार्थ देसाईवर या लिलावात कोणी बोली लावली नाही तर ते मूर्खपणाचं ठरेल. ज्या पद्धतीने सिद्धार्थने सहाव्या हंगामात खेळ केलाय तो शब्दात मांडता येणारा नाहीये. यू मुम्बाकडे त्याला आपल्या संघात कायम राखण्याची एक संधी असणार आहे, मात्र माझ्या अंदाजानुसार सिद्धार्थ यंदाच्या हंगामातला सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. अभिषेक बच्चनने आपलं मत मांडलं. या वेळी प्रो-कबड्डीचे लिग कमिशनर अनुपम गोस्वामी आणि पाटणा पायरेट्स संघाचे मालक राजेश शहा देखील उपस्थित होते.
प्रो-कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात दीड कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह एकंदर सहा जणांनी एक कोटीचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले होते, मात्र या कोट्यधीश खेळाडूंपेक्षा उदयोन्मुख खेळाडूंनीच कामगिरी उंचावली. या पाश्वभूमीवर सोमवार आणि मंगळवारी मुंबईत होणार्या प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाच्या लिलावात कोटी कोटी उड्डाणांना मर्यादा येण्याची चिन्हे आहेत. याऐवजी उदयोन्मुख खेळाडूंवरच फ्रेंचायझींचे विशेष लक्ष असेल, असा कबड्डीक्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.