सावरोली-खारपाडा राज्यमार्गावर मुसळधार पावसात पडलेल्या खड्ड्यांचा आकार वाढतच असून या रस्त्यावर दुचाकीचे रोज अपघात घडत आहेत. सावरोली-खारपाडा राज्य मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उड्डाणपूल असून दरवर्षी पावसाळ्यात पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडतात. यंदा जुलै महिन्यात कोसळलेल्या पावसात माजगाव, माडप गावाच्या हद्दीतील पुलाच्या दोन्ही बाजूला उतारावर खड्डे पडले आहेत. माडप पुलानजीक पडलेल्या खड्डयांचा आकार धडकी भरवित असून दुचाकी अपघाताचे सत्र सुरू झाले आहे. शिवाय पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहने खड्ड्यात आपटून प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत. सावरोली-खारपाडा राज्यमार्ग जरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असला तरी पुलापासून दोन्ही बाजूला दोनशे मीटर रस्त्याची देखभाल आयआरबीकडे आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम आयआरबीने तातडीने करावे अशी मागणी होत आहे.
सावरोली-खारपाडा राज्यमार्गाच्या उतारावर खड्डे पडले असून रात्रीच्या वेळेस ते अजिबात दिसत नसल्याने अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. पाऊस कमी झाला आहे. आता हे खड्डे भरावेत.
-किरण पाटील, ग्रामस्थ, माडप, ता. खालापूर
खड्डे असलेल्या ठिकाणी पाहणी केली असून, डांबर प्लांट दोन दिवसात सुरू करण्यात येईल, शुक्रवारपासून या राज्यमार्गावरील खड्डे भरण्यात येतील.
-अनिल धायगुडे, अभियंता, आयआरबी
RamPrahar – The Panvel Daily Paper