कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुका प्रेस क्लबच्या पुढील दोन वर्षांच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी दै. लोकमतचे पत्रकार तथा वकील राहुल देशमुख यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी पत्रकार नरेश शेंडे यांची वर्णी लागली आहे.
कर्जत प्रेस क्लबची बैठक जिल्हा परिषद विश्रामगृहात ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या सुरुवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी कर्जत प्रेस क्लबच्या पुढील दोन वर्षांच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून दै. लोकमतचे पत्रकार राहुल देशमुख यांची, तर उपाध्यक्ष म्हणून नरेश शेंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिवपदी पत्रकार अजय गायकवाड, तर खजिनदार म्हणून कांता हाबळे यांची निवड करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष संतोष पेरणे, माजी जिल्हा उपाध्यक्ष धर्मानंद गायकवाड, माजी जिल्हा संघटक संजय मोहिते, रायगड प्रेस क्लबचे नवनिर्वाचित खजिनदार दर्वेश पालकर यांच्यासह पत्रकार विकास मिरगणे, मल्हार पवार, अजय गायकवाड, गणेश पवार आदी पत्रकार उपस्थित होते.
प्रेस क्लबच्या बैठकीत दिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात राज्यस्तरीय संपादक यांना संतोष पवार स्मृती पुरस्कार, तर रायगड जिल्ह्यातील एका ज्येष्ठ पत्रकाराला कर्जत प्रेस क्लब सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 27 एप्रिल रोजी दिवंगत संतोष पवार यांचा वाढदिवस असून त्या दिवशी माथेरान येथे हा कार्यक्रम होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्या कार्यक्रमात दिवंगत संतोष पवार यांच्या कार्याचा आढावा घेणारी पुस्तिकाही काढली जाणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper