गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. ऊठसूठ लॉकडाऊनच्या धमक्या देणारे महाविकास आघाडीचे सरकार सध्याच्या वाढत्या संसर्गाचे निमित्त साधून पुन्हा एकदा निर्बंध लादते की काय अशी भीती जनसामान्यांना वाटू लागली होती. नेमके तसेच घडले. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे खापर लोकांवरच फोडून मुख्यमंत्र्यांनी आठवडाभर वाट पाहून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल अशी इशारेवजा धमकी रविवारी दिली.
कोरोनाचा वाढता संसर्ग ही काळजामध्ये धडकी भरवणारी बाब आहेच. नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख निरंतर खाली येत होता. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आपण कोरोनावर विजय मिळवल्यासारखेच वातावरण निर्माण झाले कारण याच काळामध्ये कोरोना विषाणूचा नायनाट करू शकणार्या दोन लसी भारतीय कंपन्यांनीच वितरित करण्यास प्रारंभ केला. आणखी चार लसी लवकरच उपलब्ध होतील अशीही खबर पाठोपाठ आली. साहजिकच लोकांमधील भीतीची भावना थोडीशी चेपली गेली. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण कमी संख्येने आढळू लागले होते. पण फेब्रुवारीच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यात अमरावती, हिंगोली, अकोला आणि विदर्भातील काही भागात रुग्णसंख्या वाढीस लागली. मुंबईत देखील रोज साडेतीनशे ते चारशे रुग्ण आढळत होते, ती संख्या हजाराच्या जवळ गेली. या सार्याचे खापर महाविकास आघाडीने अत्यंत सोयीस्कररित्या लोकांच्या वर्तणुकीवर फोडले. देशाचे अर्थचक्र हळूहळू रुळावर येत आहे. त्यानुसार महाराष्ट्रात देखील सारे व्यवहार रांगेला लागत आहेत. या काळामध्ये रहदारी आणि गर्दी दोन्हीही वाढणार हे अपेक्षितच होते. निर्बंध शिथिल केल्यानंतर, काही हॉटेले उपाहारगृहे, मॉल्स, दुकाने आणि मंदिरे सुरू झाल्यानंतर लोकांनी घरात बसून रहावे अशी सरकारची अपेक्षा होती काय? रविवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह आणि टीव्हीच्या माध्यमातून लोकांनी काळजी न घेतल्याबद्दल खंत व्यक्त केली आणि लॉकडाऊन नको असेल तर नीट वागा असे मऊ भाषेत बजावले. इथवर सारे ठीक होते. परंतु या फेसबुकी संवादात मुख्यमंत्र्यांनी मी जबाबदार या नावाची आणखी एक मोहीम जाहीर करून टाकली. या आधी पार पडलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे काय भजे झाले हे सार्यांनी अनुभवलेच आहे. शिवभोजन थाळी ही कोरोना काळातील मुख्यमंत्र्यांची लाडकी योजना. प्रत्यक्षात हे शिवभोजन कोणाच्या पोटात गेले याच्या सुरस कथा फेसबुकवरच सापडतात. या दोन योजनांच्या भरघोस यशानंतर मुख्यमंत्र्यांनी मी जबाबदार ही मोहीम सुरू करण्याचा आदेश दिला आहे. या मोहीमेत नेमके काय घडणार याचा अंदाज धड कोणाला लागलेला नाही. आपण आपली काळजी घ्यावी एवढेच त्यातून सध्या तरी ध्वनित होते. लोकांनी लोकांची काळजी घ्यायची असेल तर महाविकास आघाडीचे सरकार केवळ खुर्च्या उबवण्यासाठी बसले आहे का? कोरोनाच्या दुसर्या संभाव्य लाटेच्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणा पुरेशी सुसज्ज आहे का? पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल अशी धमकी देणे सोपे आहे. पण तशी दुर्दैवाने वेळ आलीच तर त्यातून जी परिस्थिती निर्माण होईल तिला तोंड कसे आणि कोणी द्यायचे? पुन्हा लॉकडाऊनसारखे पाऊल उचलल्यास महाराष्ट्राचे अर्थचक्र उलटे फिरेल आणि संपूर्ण राज्य पुन्हा सावरू शकणार नाही. तसे घडले तर सरकारला तुम्हीच जबाबदार असे सांगावे लागेल.