आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही; विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे ही आपली कायम भूमिका असते. त्यामुळे कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी व सदैव सहकार्य करीत राहणार, अशी ग्वाही भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. ते तळोजा एमआयडीसीत बोलत होते.
ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या तळोजा एमआयडीसी येथील विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 21) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, जीएसटी मुंबई विभाग आयुक्त राजेंद्र सरवदे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, वासुदेव घरत, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, संतोष भोईर, विष्णू जोशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर, साक्षी एंटरप्रायजेसचे सतीश म्हात्रे, राजू चव्हाण, वलपचे सरपंच भोलानाथ पाटील, माजी सरपंच गोविंद गायकर, किरण दरे, दीपक बोंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, तळोजा मजकूरचे माजी सरपंच संतोष पाटील, सुनील गोवारी आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे राजकुमार म्हात्रे आणि भाजपचे प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी स्वागत केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हटले की, तळोजा एमआयडीसीत विविध प्रकारचे अनेक कारखाने आहेत. त्यामध्ये माथाडी, ट्रान्सपोर्ट, जनरल असे अनेक प्रकारचे कामगार गणले जातात. या सर्व कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीने नेतृत्वाची गरज लागते. मला नक्की खात्री आहे की नंदकुमार म्हात्रे त्या दृष्टिकोनातून त्यांना निश्चितपणे चांगले नेतृत्व देतील आणि त्यांना राजकुमार म्हात्रे व सहकारी कामगारांच्या उन्नतीसाठी ताकद देतील.
या परिसरामध्ये कामगारांचे शोषण-पिळवणूक होऊ नये यासाठी ही संघटना काम करेल आणि त्याकरिता त्यांना लागेल ते सहकार्य आम्ही देऊ, अशी ग्वाहीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी दिली.