Breaking News

कोरोनातील विरंगुळा-अर्बन हाट

कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला लागलेला आहे.उद्योगधंद्यांच्या दृष्टीकोनातून 2020 हे वर्ष इतके वाईट असेल ही कल्पनादेखील कोणी केली नसेल. या महामारीच्या प्रकोपामुळे लहान, सुक्ष्म उद्योग, हातमाग व्यापारी, खादी, हस्तकला उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता कुठेतरी हळूहळू हे लहानसहान उद्योजक या आर्थिक मंदीतून वर येण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना काळात महाराष्ट्रासह देशाच्या इतर राज्यातील लघु उद्योजकांना, कलाकरांना स्वबळावर पुन्हा नव्या उत्साहाने उभे राहण्याची संधी अर्बन हाटने उपलब्ध करून दिली आहे. कोरोनामुळे आर्थिक व मानसिकरित्या नैराश्यात लोटलेल्या कलाकरांना, कारागिरांना अर्बन हाटने नवी उमेद दिली आहे. 22 जानेवारी 2010 रोजी मुंबई महानगरक्षेत्र विकास प्राधिकरणाने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे अर्बन हाट (कलाग्राम) नागरिकांसाठी खुले करून दिले. दिल्ली येथील कलाग्रामच्या धर्तीवर हे कलाग्राम उभारण्यात आले आहे. सीबीडी रेल्वे स्थानकानजीक असलेले हे अर्बन हाट सुमारे पाच हेक्टरच्या विस्तीर्ण जागेत वसलेले आहे. नवी मुंबईतील संस्कृतीला या वास्तूमुळे एक आगळी वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. 2010 पासून आतापर्यंत विविध प्रकारचे एकूण 170 मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. कोकण सरस सारख्या महामेळाव्यात कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदूर्गमधील ग्रामीण भागातल्या महिलांना, बचतगटांना, कलाकरांना आपले उत्पादन विकण्याची संधी प्राप्त झाली. अर्बन हाटमुळे ग्रामीण भागातील लघुउद्योजक, शेतकरी, कारागिरांना अर्थार्जनासाठी बाजारपेठ व व्यासपीठ प्राप्त झाले आहे. देशाच्या विविध राज्यांतून येणार्‍या कलाकार, कारागीरांना आपल्या कला, हस्तकला, तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन करण्याची संधी येथे उपलब्ध होते. तसेच कलेची जाण असलेल्या प्रेक्षक वर्गाकडून त्या कलाकृती विकत घेतल्या जातात. त्यामुळे कलाकरांना त्यांच्या कलेची योग्य किंमतही मिळते. नितांत सुंदर अशा वनपरिसरात हे अर्बन हाट तयार करण्यात आले आहे. फुला-फळांची विविध प्रकारची चार हजारहून जास्त झाडे असलेला हा परिसर फिरताना जंगल सफारी केल्याचा अनुभव मिळतो. विशेष म्हणजे झाडांना न कापता ही वास्तू उभारण्यात आली आहे. त्यामुळे याठिकणी नागरिकांना विविध प्रकारची खूप वर्षे जूनी झाडे पाहायला मिळतात. अर्बन हाटमध्ये विविध राज्यांतून येणार्‍या कारागिरांनी निर्मिलेली तागाची उत्पादने, काष्ठ कला उत्पादने, गालिचे, कृत्रिम दागिने, सुगंधी उदबत्त्या, बांबूपासून तयार केलेल्या कलाकृती, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या कलात्मक वस्तू, चित्रे, मातीची भांडी, चामड्याची उत्पादने, ड्रेस मटेरिअल, साड्या, एम्ब्रॉयडरी, पिशव्या, पादत्राणे, कॉटन ब्लॉक प्रिंट आणि कलाकुसरीच्या अन्य वस्तू प्रदर्शनार्थ तसेच विक्रीसाठी एकूण 60 दालने (गाळे) माफक दरात उपलब्ध आहेत. अर्बन हाटमुळे नवी मुंबईकरांना एकाच छताखाली पारंपरिक व आधुनिक उत्पादने उपलब्ध झाली आहेत. टाळेबंदीनंतरची अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यापासून, अर्बन हाट येथे नोव्हेंबर 2021 पासून दर महिन्याला महोत्सवाचे आयोजन करून कारागीर आणि कलाकारांना अर्थार्जनाची संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान, हॅन्डीक्राफ्ट, शिल्पमेळा, संक्रांतमेळा आणि वसंतमेळा असे चार महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यांमध्ये 400 हून अधिक कलाकार, कारागीरांनी आपल्या कला, हस्तकालांचे प्रदर्शन केले. तसेच चार हजारपेक्षा जास्त नागरिक, कलाप्रेमींनी अर्बन हाटला भेटी दिल्या. अर्बन हाट परिसर स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण असल्याने याची आयोजकांतर्फे पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. अर्बन हाटचा परिसर खुला असल्याने तसेच तेथे उभारण्यात येणारे स्टॉल आकाराने मोठे असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. मेळाव्यात येणार्‍या नागरिकांना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच प्रवेशद्वारावरच थर्मल स्कॅनिंग व सॅनिटायझर किंवा हॅन्ड वॉशने निर्जुंतुकीकरण केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश देण्यात येतो. अर्बन हाटमध्ये तयार करण्यात आलेल्या बटरफ्लाय गार्डन मध्ये तब्बल 28 पेक्षा जास्त प्रजातीची फुलपाखरे पहायला मिळतात. अर्बन हाट हे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सहलीचे (स्टडीटूर) ठिकाण बनले आहे. आतापर्यंत भारतातील सुमारे 25 आर्कीटेक्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या अर्बन हाटला भेट दिलेली आहे. येथील निसर्गरम्य शांत परिसरामुळे युपीएससी, एमपीएससीचे विद्यार्थी अभ्यासासाठी या ठिकाणी येत असतात. 2010 पासून अर्बन हाटमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरीवादक), जगजितसिंग आणि पंडित जसराज या प्रख्यात संगीतकारांनी शहरी हॅटमध्ये संगीताचे कार्यक्रम सादर केले. त्याचप्रमाणे मराठी, बंगाली, केरळ, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्री अशा चित्रपट जगातील ख्यातनाम कलाकारांनी अनेक कार्यक्रमात भाग घेतला. मुंबई-नवी मुंबईच्या शाळा व महाविद्यालयांनी अर्बन हाटमध्ये उपलब्ध अ‍ॅम्पीथिएटरमध्ये वार्षिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.  कोरोनाच्या आधी आणि कोरोना नंतर काही जास्तच प्रमाणात ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांना आपल्या आवडी निवडीप्रमाणे घरी बसल्या बसल्या वस्तू खरेदी कराता येतात. फ्लीपकार्ट, मॅझोन, मिन्त्रा सारख्या विविध नामांकित कंपन्या ऑनलाइन पध्दतीने वस्तूंची विक्री करतात. यामध्ये ग्राहकांना जितके सोप्यापध्दतीने घरीबसल्या वस्तू खरेदी करता येतात तितकाच ऑनलाईन व्यवहारात धोकाही पत्करावा लागतो.ऑनलाइन शॉपिंगमधून होणार्‍या फसवणूकीच्या बातम्या रोज ऐकायला व पहायला मिळतात. ऑनलाइन शॉपिंगमुळे शासनामार्फत भरवण्यात येणार्‍या अशा मेळाव्यांकडे नागरिकांचा कानाडोळा होत आहे. त्यामुळे अशा मेळाव्यांना हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. बरेच वेळा काही वस्तू ऑनलाइन मिळत नाही अशा दूर्मिळ, चांगल्या दर्जाच्या वस्तू फक्त या मेळाव्यांमध्येच बघायला मिळतात. नागरिकांनी अशा मेळाव्यांना भेट देऊन इथल्या वस्तू खरेदी केल्यास ग्रामीण भागातील हस्तकलाकार, कारागिर, लघुउद्योजक, बचतगटांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यास मदत होईल व त्यांचे मनोबल वाढेल.

अर्बन हाट हे केवळ मर्यादीत क्षेत्रातील विभागांसाठी नसून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या प्रदर्शन, उत्पादन विक्रीसाठी खुले आहे.संपूर्ण अर्बन हाटचे एका दिवसाचे भाडे 40 हजार आहे. यात 60 पेक्षा जास्त गाळे, थिएटर, सुरक्षेच्या दृष्टीने सर्व कर व सेवा सुविधांचा समावेश आहे. कोरोना आता पुन्हा डोके वर काढत आहे. वाढत्या कोरोनाला वेळीच अटकाव करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. सद्या कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अर्बन हाटमध्ये आयोजित करण्यात आलेले मेळावे पुढे ढकलण्यात आले आहेत.

-प्रवीण डोंगरदिवे, माहिती सहाय्यक, विभागीय माहिती कार्यालय,कोकण विभाग, नवी मुंबई

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply