सिडनी : वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार व धडाकेबाज सलामीवीर अॅरॉन फिंचला एकाही संघाने विकत न घेतल्याचा मुद्दा गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. फिंचवर एकाही संघाने बोली न लावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने यापूर्वी आश्चर्य व्यक्त केले होते. आता पुन्हा एकदा क्लार्कने प्रतिक्रिया दिली आहे, पण या वेळी त्याने फिंचला त्याने केलेल्या एका विधानाबाबत सुनावले.
आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने न खरेदी केल्यानंतर बिग बॅश लिगमधील खराब कामगिरीमुळे आयपीएल लिलावात माझ्यावर बोली लागणार नाही याची मला अपेक्षा होती, असे फिंच म्हणाला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना क्लार्कने फिंचला सुनावलेय. तू ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार आहेस, आयपीएलमध्ये प्रत्येक संघ तुला त्यांच्या ताफ्यात प्रयत्न करेल अशीच अपेक्षा तू ठेवायला पाहिजे, असे क्लार्क म्हणाला.
‘मी त्या दिवशीही म्हणालो होतो की एकाही आयपीएल संघाने त्याच्यावर बोली लावली नाही, आणि त्यावर मला हे अपेक्षित होते, असे तो म्हणतो. टी-20 प्रकारात तू ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहेस. प्रत्येक संघाला तू त्यांच्या संघात हवाय असाच विचार तू करायला पाहिजे,’ अशा शब्दात क्लार्कने बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्ट नावाच्या एका कार्यक्रमात बोलताना फिंचच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
फिंचला गेल्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्सकडून खेळताना आपली छाप पाडता आली नव्हती. त्यामुळे या वेळी लिलावात रॉयल चॅलेंजर्सने फिंचला रिलीज केले होते, पण एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …