खासदार संभाजीराजेंच्या अधिकार्यांना सूचना
महाड : प्रतिनिधी
रायगड किल्ल्यावर सुरु असलेली विकास कामे येत्या एप्रिल महिन्या अखेरपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी (दि. 24) संबंधीत अधिकारी व ठेकेदारांना दिल्या.
खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी रायगड किल्ल्यास भेट दिली. या वेळी त्यांनी गडावरील रोप वे अप्पर स्टेशन ते होळीचा माळ या फरसबंद मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हत्तीखान्यानजीक प्राधिकरणाचे कंत्राटदार, अधिकारी तसेच पुरातत्त्व विभाग, महावितरण, बांधकाम विभाग व एमटीडीसीचे अधिकारी आणि प्रांताधिकारी यांची बैठक घेऊन सध्या सुरू असलेली कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
राजसदरेवर महाराजांना अभिवादन केल्यानंतर सदरेवरील बँरिकेटस्चा विषय चर्चेस येताच संभाजीराजे यांनी उपस्थित पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून, सदरेवरील बँरिकेटस् तत्काळ हटविले व शिवभक्तांना राजसदरेवर प्रवेश खुला केला.
या वेळी संभाजीराजे यांनी शिवभक्तांना राजसदरेवर येताना काही शिष्टाचार पाळण्याचे आवाहन केले. राज सदरेवर डाव्या बाजूने यावे व उजवीकडून उतरावे, तख्ताच्या जागेवर जाऊ नये, सेल्फी घेऊ नये व सदरेवर शांतता पाळावी, अशा सूचना त्यांनी शिवभक्तांना दिल्या.
रायगड विकास प्राधिकरण व पुरात्तव विभागामार्फत गडावरील जगदीश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला होत असलेल्या उत्खनन जागांची संभाजीराजांनी सविस्तर माहिती घेतली व सापडलेल्या वास्तुशास्त्रीय बाबीही समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी प्राधिकरणातर्फे होत असलेल्या जगदीश्वर मंदिर फरसबंदीची आणि गडावर सुरु असलेल्या भूमिगत इलेक्ट्रिकल केबलच्या कामांची पहाणी केली. हत्ती तलाव आणि नाना दरवाजामार्गे सुरू असलेल्या पायरीमार्ग कामाचीही त्यांनी पाहणी केली.
पावसाळ्यात रायगडावरील नाणेदरवाजावर पाण्याच्या प्रवाहाचा दाब येऊ नये, यासाठी शिवकाळातील रचनाबंध असणार्या गटर्सची पाहणी करुन, त्यांचा सध्या वापर करता येऊ शकतो का, या विषयावर विचारविनिमय करण्यात आला.
सध्या गडावर सुरू असलेली विकास कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी या वेळी व्यक्त केला.