नागोठणे : प्रतिनिधी
अनेक दशकानंतर नागोठणे शहराच्या परिसरात मंगळवारी रात्रीच्या दरम्यान एका व्यक्तीला बिबट्याचे दर्शन झाले.
नागोठणे शहरात मुंबई- गोवा महामार्गालगत असणार्या एका हॉटेलच्या परिसरात वाघ फिरत असल्याचे एक व्यक्तीच्या निदर्शनास आले. त्याने उत्सुकतेने आपल्या मोबाइलवर त्याचे चित्रणसुद्धा केले. महामार्गावरून जाणार्या वाहनांच्या आवाजामुळे घाबरून हा वाघ तेथून निघून गेला. ही बाब सत्य असल्याचे सांगून नागोठणे परिक्षेत्राचे वनाधिकारी किरण ठाकूर यांनी हा वाघ बिबट्या जातीचा होता, असे स्पष्ट केले.
नागोठणे परिसरात रात्री वाघ आल्याचे वृत्त कळल्यानंतर वन कर्मचार्यांसह त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. पहाटेपर्यंत हा संपूर्ण परिसर आम्ही पिंजून काढला. मात्र, हा बिबट्या आढळून आला नाही. तो नक्की कुठे गेला, हे कळून आले नसल्याने परिसरातील जनतेने दक्षता घ्यावी, अशा सूचना वनविभागाच्या कर्मचार्यांकडून देण्यात आल्या असल्याचे वनाधिकारी किरण ठाकूर यांनी सांगितले.
हॉटेलमधील मांसाहारी पदार्थ त्याच हॉटेलच्या परिसरात फेकले जात असल्याने जंगली श्वापदे ते खाण्यासाठी जंगल सोडून मानवी वस्तीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा पदार्थांची हॉटेल व्यावसायिकांनी योग्य ती विल्हेवाट लावण्यासंदर्भात नागोठणे ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे वनाधिकारी ठाकूर यांनी या वेळी स्पष्ट केले.