नागोठणे : प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीने पुन्हा डोके बाहेर काढले आहे. शहरात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नसला तरी, नागरिकांनी पूर्ण दक्षता घेताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी केले आहे. नव्या कोरोनाविषयी जनजागृती होण्यासंदर्भात संपूर्ण शहरात दवंडीसुद्धा देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गतवर्षी कोरोनाच्या महामारीने नागोठण्यातील सुमारे अडीचशे नागरिकांना गाठले होते व त्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. या महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याने त्याची लागण पुन्हा होऊ नये, यासाठी कोरोना विषाणू उपाययोजना व त्याबाबत घ्यावयाची काळजी या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडून सर्व ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आली आहे. यात 19मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलन, सामूहिक कार्यक्रम, सभा याठिकाणी फक्त पन्नास व्यक्तींना परवानगी द्यावी. तसेच मिरवणूक, रॅली यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. लग्नसमारंभात पन्नासपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास संबंधित मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरणासाठी फवारणी सुरू करावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा. अंत्यविधीच्या वेळी स्मशानभूमीत मास्कचा वापर अनिवार्य करावा हे त्यातील काही ठळक मुद्दे आहेत.
शासनाच्या नियमानुसार नागोठणे शहरात विनामास्क फिरणार्यांची शोध मोहीम तातडीने सुरू करणार असून अशा बेजबाबदार व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सुरू करणार असल्याचे सरपंच डॉ. धात्रक यांनी या वेळी स्पष्ट केले.