Breaking News

देशात रुग्णवाढीचा नवा उच्चांक; मृतांच्या संख्येतही झाली मोठी वाढ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

प्रचंड वेगाने वाढणार्‍या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रासह देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत चालली आहे. देशात रविवारी (दि. 11) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली. देशात 1,52,879 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूची संख्याही वाढली असून, आठशेपर्यंत मर्यादित असलेली मृतांची संख्या आठशेच्या पार गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार देशात 24 तासांमध्ये एक लाख 52 हजार 879 कोरोनाबाधित आढळून आले, तर 90 हजार 584 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. 24 तासांत 839 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर देशात आतापर्यंत एक लाख 69 हजार 275 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

‘रेमडेसिवीर’ची निर्यात थांबवली; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सध्या थैमान घातले आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय रुग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत देशात कोरोनाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत रेमडेसिवीरच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. याशिवाय ज्या स्थानिक कंपन्या रेमडेसिवीरचे उत्पादन करतात त्यांना त्यांच्या वेबसाईटवर संपूर्ण साठ्याची माहिती टाकावी लागणार आहे. कोणत्या वितरकांच्या माध्यमातून त्या पुरवठा करीत आहेत याबाबतदेखील माहिती द्यावी लागेल, तसेच औषध निरीक्षक व इतर संबंधित अधिकार्‍यांना रेमडेसिवीरच्या साठ्यावर सातत्याने लक्ष द्यावे लागणार असून, काळाबाजार रोखण्यासाठी काय उपाय करण्यात आले आहेत हेही जाहीर करावे लागणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply