Breaking News

कर्जत शहरातील उघडी गटारे होणार बंदिस्त

नगर परिषद पदाधिकार्‍यांकडून पाहणी

कर्जत : बातमीदार

कर्जत शहरातील सर्व रस्ते अद्याप काँक्रीटचे झाले नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गटारे उघडी असून त्यातून डासांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. हे लक्षात घेता नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपल्या सहकारी सदस्यांसह नागरी भागात जाऊन गटारांची पाहणी केली. दरम्यान, काँक्रीटचे रस्ते न झालेल्या भागातील रहिवाशांना डासांचा त्रास आणि दुर्गंधीमधून मुक्तता मिळावी, यासाठी तेथील गटारांवरील झाकणे नगर परिषद बसवून घेईल, असे आश्वासन दिले आहे.

  नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी दुपारी नगर परिषदेचे अभियंते निलेश चौडीए आणि मनीष गायकवाड यांच्यासह दहिवली आणि कोतवालनगर भागात पाहणी दौरा केला. कोतवालनगर येथे त्यांनी स्थानिक नगरसेवक बळवंत घुमरे, प्राची डेरवणकर आणि माजी नगरसेविका बिनिता घुमरे यांच्यासह उघड्या गटारांची पाहणी केली. या भागात काँक्रीटचे रस्ते झाले नसल्याने गटारेदेखील मोडकळीस आलेली आहेत, हे लक्षात घेता रस्त्यांची कामे होतात तेव्हा होतील पण त्याआधी येथील गटारे झाकणे लावून बंदिस्त करण्याच्या सूचना नगराध्यक्ष जोशी यांनी अभियंत्यांना दिल्या. शिवाजीनगर येथे नगराध्यक्ष जोशी यांनी नगरसेवक संकेत भासे यांच्यासह पाहणी करताना गटारे ही उघडी राहणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना केल्या. या वेळी डॉ. नीलकंठ फडके, दिनेश सोळंखी, प्रधान, कुडे सर आदी नागरिक उपस्थित होते.

कर्जत शहरातील गटारे सांडपाण्याने तुंबणार नाहीत, याची काळजी घ्यावी तसेच दर आठवड्याला धूर फवारणी करण्याचे आदेश नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी या वेळी अधिकार्‍यांना दिले. लवकरच उघडी गटारे बंदिस्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply