पनवेल : प्रतिनिधी
खारघर शहरामधील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख व उपआयुक्त संजय शिंदे यांची भेट घेऊन खारघर शहरातील रहिवाशांना आलेल्या प्रस्तावित मालमत्ता कर नोटिसांबाबत रहिवाशांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोचवण्यासाठी निवेदन सादर केले.
पनवेल महापालिकेने प्रस्तावित केलेले मालमत्ता कर दर हे खूपच जास्त असून त्यात सूट व शुल्क भरण्यासाठी सवलत मिळावी. यासाठी भारतीय जनता पक्षाचे खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली खारघरमधील नगरसेवक प्रवीण पाटील, अनिता पाटील, अभिमन्यु पाटील, शत्रुघ्न काकडे, हर्षदा उपाध्याय, रामजी बेरा, आरती नवघरे, नरेश ठाकूर, संजना कदम, नीलेश बावीस्कर, खारघर मंडल सचिव दीपक शिंदे, किर्ती नवघरे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, रमेश खडकर, संजय घरत, निशा सिंह, समीर कदम, ओबीसी सेल अध्यक्ष सुरेश ठाकूर, महिला मोर्चा सचिव साधना पवार, सोशल मीडिया उपाध्यक्ष मोना अडवाणी आणि सोशल मीडिया अध्यक्ष अजय माळी आदींनी हे निवेदन सादर केले.
खारघर शहरवासीय सिडकोस गेली अनेक वर्षे सेवाशुल्क भरत आहेत. प्रस्तावित मालमत्ता कर हे 2016 पासून भरावयाचे आहेत. त्यामुळे नागरिकांना दुहेरी कर आकारणी भरावी लागणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेकांनी आपल्या नोकर्या गमावल्या आहेत. अनेक व्यापार्यांचा व्यापार बंद पडला आहे अथवा मंदावला आहे, अशा परिस्थितीत या दुहेरी करआकारणीमुळे रहावाशांवर प्रचंड आर्थिक बोजा पडणार आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता महापालिकेने कर आकारणीचे दर कमी करावेत व कर भरणा करण्यास मुदत वा सवलत द्यावी. ज्यामुळे रहिवाशांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, अशी मागणी खारघरमधील सर्व रहिवाशांच्या वतीने या निवेदनाद्वारे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकार्यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.