श्रीलंकेवर सात गडी राखून विजय
कोलंबो ः वृत्तसंस्था
कर्णधार शिखर धवन (95 चेंडूंत नाबाद 86 धावा), पदार्पणवीर इशान किशन (42 चेंडूंत 59) आणि सलामीवीर पृथ्वी शॉ (24 चेंडूंत 43) या त्रिकुटाने केलेल्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला तब्बल सात गडी आणि 80 चेंडू राखून सहज पराभूत केले.
श्रीलंकेने दिलेले 263 धावांचे लक्ष्य भारताने 36.4 षटकांत गाठले. मुंबईकर पृथ्वीने धडाकेबाज सुरुवात केल्यामुळे भारताने पाच षटकांतच अर्धशतक पार केले. नऊ चौकारांची आतषबाजी केल्यावर पृथ्वी माघारी परतला. त्यानंतर तिसर्या क्रमांकावर आलेल्या ईशान किशनने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावून धावगती कायम राखली. किशनने आठ चौकार आणि दोन षटकारांसह कारकीर्दीतील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावत वाढदिवस जोरदार साजरा केला. बाद होण्यापूर्वी त्याने धवनच्या साथीने दुसर्या गड्यासाठी 85 धावांची भर घातली.
यानंतर धवनने सामन्याची सूत्रे हाती घेत कारकीर्दीतील 33वे अर्धशतक साकारले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या मनीष पांडेने 26 धावांचे योगदान दिले, तर आणखी एक पदार्पणवीर सूर्यकुमार यादवने नाबाद 31 धावा फटकावून धवनला सुयोग्य साथ दिली. 37व्या षटकातील चौथ्या चेंडूवर एकेरी धाव घेत धवनने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
तत्पूर्वी, तब्बल दोन वर्षांनी एकत्रित खेळणार्या यजुर्वेद्र चहल (2/52) आणि कुलदीप यादव (2/48) या फिरकीपटूंमुळे भारताने श्रीलंकेला 9 बाद 262 धावांत रोखले. चहलने अविष्का फर्नाडोला (33) आणि कर्णधार दसून शनाका (39) यांना बाद केले, तर कुलदीपने भानुका राजपक्क्षा (24) आणि मिनोद भानुका (27) यांचे बळी मिळवले. अखेरच्या षटकांत चमिका करुणारत्नेच्या (नाबाद 43) फटकेबाजीमुळे श्रीलंकेने अडीचशे धावांचा टप्पा गाठला. दुसरा सामना मंगळवारी (दि. 20) आहे.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : 50 षटकांत 9 बाद 262 (चमिका करुणारत्ने नाबाद 43; कुलदीप यादव 2/48, यजुर्वेद्र चहल 2/52) पराभूत वि. भारत : 36.4 षटकांत 3 बाद 263 (शिखर धवन नाबाद 86, इशान किशन 59, पृथ्वी शॉ 43; धनंजया डीसिल्व्हा 2/49).