Breaking News

सेंद्रिय पद्धतीने हळदीचे बंपर पीक

सुधागड तालुक्यातील तरुण शेतकर्‍याची किमया

पाली ः प्रतिनिधी
मनात जिद्द, कष्ट उपसण्याची तयारी व धमक असेल, तर परिस्थिती कोणतीही असो त्यावर मात करून स्वतःला सिद्ध करता येते हे सुधागड तालुक्यातील दिनेश बुरुमकर ह्या होतकरू तरुणाने दाखवून दिले आहे. पिंपळोली येथील प्रयोगशील तरुण शेतकरी दिनेश यांनी अथक मेहनतीच्या जोरावर हळदीच्या पिकाची सेंद्रिय पद्धतीने यशस्वी लागवड केली. अवघ्या 30 गुंठ्यांत त्यांनी बंपर पीक मिळविले आहे. सध्या बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर सतावतेय. अशातच तरुण शेतीकडे वळताहेत ही स्वागतार्ह बाब आहे.
दिनेश यांची घरची परिस्थिती गरीब आहे, मात्र मेहनत, जिद्द आणि काहीतरी करून दाखविण्याच्या आत्मविश्वासाने ते मागील दोन वर्षांपासून आपल्या शेतात हळदीचे उत्पादन घेत आहेत. सुरुवातीला हळदीच्या पिकाच्या लागवडीबद्दल पुरेशी माहिती व मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांना यातून कमी उत्पादन मिळाले, परंतु तरीदेखील त्यांनी हार मानली नाही आणि यंदा त्यांनी योग्य मार्गदर्शन व शास्त्रशुद्ध माहिती मिळवून 30 गुंठे क्षेत्रात 110 किलो हळदीची सेंद्रिय पद्धतीने लागवड करून दोन टनांचे भरघोस उत्पादन मिळविले आहे.
त्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या हळदीला मागणीही खूप आहे. यासाठी त्यांना कृषिकन्या रसिका फाटक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी या शेतकर्‍याची दखल घेऊन नुकताच त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

मी शेतीच्या पद्धतीत बदल करीत गेलो. सगुणा राइस टेक्नॉलॉजीचा वापर करून खरीप हंगामातील भात आणि रब्बी हंगामातील वाल या पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले. त्यानंतर हळदीकडे वळलो. प्रत्येक शेतकर्‍याने जोडधंदा म्हणून हळदीच्या पिकाची लागवड करावी. यातून भरघोस उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न मिळविता येते.
-दिनेश बुरुमकर, प्रयोगशील शेतकरी

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply