पनवेल : वार्ताहर – पनवेलजवळील पळस्पे फाटा येथे दररोज मोठ्या प्रमाणात पनवेलकडून पुण्याकडे जाणार्या रस्त्यावर पेट्रोल पंप परिसरात वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विनापरवाना हातगाड्या व खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यात येत असल्याने होते. तरी पनवेल वाहतूक शाखेने संबंधित गाड्यांवर कारवाई करून रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पनवेलसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली व परिसरातील नागरिक पुणे व कोकणात जातात. या वेळी ते चारचाकी वाहने घेऊन जातात. पळस्पे फाटा येथे असलेले बीअर बार, वाइन शॉप तसेच रस्त्यावर मिळणारी खाद्यपदार्थ व इतर दुकानांत खरेदीसाठी वाहनचालक रस्त्यावरच आपली वाहने उभी करून खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
काही अंतरावर महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळेसुद्धा रस्ता छोटा करण्यात आला आहे. त्यातच वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या संदर्भात संबंधित वाहतूक शाखेकडे वेळोवेळी तक्रार करूनसुद्धा कारवाई का होत नाही, असा सवाल परिसरातील रहिवासी करीत असून येथील रहिवाशांना वाहतूक कोंडीचा नियमित त्रास होतो. तरी वाहतूक शाखेने येथे वाहतूक पोलीस उभे करून तसेच रस्त्यावर विनापरवाना वाहने उभी करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवासी करीत आहेत.