उरण ः प्रतिनिधी
उरण नगर परिषदेच्या सन 2021-22 वर्षासाठी सहा कोटी 64 लाख 99 हजार 876 रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला नुकतीच सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे.
उरण नगर परिषदेचे सन 2020-21चे सुधारित, तर 2021-22 वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सभागृहात मांडण्यात आले. 2021-22 वर्षात प्रारंभीची शिल्लक, विविध कर, अनुदाने, अंशदाने आदी मिळून 49 कोटी 93 लाख पाच हजार 876 रुपये जमा होणार आहेत. यातून कामगार, अधिकार्यांचे वेतन, सोयीसुविधा, वीज बिल, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, विविध विकासकामे, विकास योजना आदी बाबींवर 43 कोटी 28 लाख 15 हजार रुपये खर्च होणार आहेत.
सहा कोटी 64 लाख 90 हजार 876 रुपयांचे शिलकी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सभागृहात मंजूर करण्यात आल्याची माहिती उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी दिली. पाच वर्षांपासून प्रशासकीय बिल्डिंग, बहुपयोगी टाऊन हॉल, फूल मार्केट, समाज मंदिर आदी विकासकामे विरोधकांकडून केले जाणारे गलिच्छ राजकारण व काही तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण राहिली आहेत. राज्य सरकारकडून प्रलंबित असलेल्या विकासकामांसाठी फंडिंग होणार नसले तरीही जुन्या प्रलंबित असलेल्या विकास योजना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
उरण नगर परिषदेकडे एमआयडीसीची पाणी बिलाची थकबाकी भरण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी काही उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेल्या भवरा पाण्याच्या साठवणूक टाकीच्या बांधकामांत अनेक त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. गणेश शिंदे यांनी केलेले ठेकेदारीतील टक्केवारीचे आरोप राजकीय द्वेषापोटी केले असल्याचे सांगून नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.