लंडन : वृत्तसंस्था
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना विस्डनकडून वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. कोहलीला सलग तिसर्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे.
विस्डन क्रिकेटर ऑफ दी इयर पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्येही कोहलीने स्थान पटकावले आहे. त्याच्यासह पाच खेळाडूंत टॅमी बीयूमोंट, जोस बटलर, सॅम कुरन आणि रॉरी बर्न्स यांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान हा सलग दुसर्या वर्षी ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.
1889पासून विस्डन क्रिकेट पुरस्कार दिला जातो. कोहलीला सलग तिसर्यांदा हा पुरस्कार मिळाला. त्याने तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 2735 गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडमध्येही कोहलीची बॅट चांगलीच तळपली होती. तेथे पाच कसोटी सामन्यांत त्याने 59.3च्या सरासरीने 593 धावा केल्या होत्या.
महिला क्रिकेटपटूंत मानधनाची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. तिने 2018मध्ये वन डे व ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 669 व 662 धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये होणार्या महिला सुपर लीग टी-20मध्ये तिने 174.68च्या स्ट्राईक रेटने 421 धावा केल्या आहेत आणि त्यात एका शतकाचाही समावेश आहे.