अहमदाबाद ः वृत्तसंस्था
कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया ट्वेण्टी-20 मालिकेत इंग्लंडचा सुफडा साफ करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे, पण भारतीय संघासमोर अडचणी वाढत चालल्या आहेत. आयपीएल 2020 गाजवल्यानंतर टीम इंडियाकडून ट्वेण्टी-20 संघात स्थान पटकावणार्या टी. नटराजनचे या मालिकेत खेळणे धोक्यात आले आहे. दुखापतीमुळे सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी गेला होता, पण तो अजूनही तंदुरूस्त झालेला नाही. त्यातच वरूण चक्रवर्थी राहुल टेवाटिया हे दोघेही तंदुरुस्ती चाचणीत नापास झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ट्वेण्टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया मुंबई इंडियन्सचा गोलंदाज राहुल चहर याचा संघात समावेश करणार असल्याची शक्यता आहे. 29 वर्षीय वरुण चक्रवर्थी सलग दुसर्यांदा तंदुरुस्तीच्या चाचणीत अपयशी ठरला आहे. यापूर्वी या गोलंदाजाची ऑस्ट्रेलिया दौर्यातील ट्वेण्टी-20 मालिकेसाठी निवड झाली होती, पण खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. आयपीएल 2020मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. वरुण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बराच काळ होता आणि इंग्लंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठीच्या संघात त्याची निवड करण्यात आली, पण यो-यो चाचणीत व दोन किलोमीटर धावण्याच्या परीक्षेत तो नापास झाला. टी. नटराजन हाही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्याच्या गुडघ्याला व खांद्याला दुखापत झाली आहे आणि तो 12 मार्चच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे. 29 वर्षीय नटराजनने ऑस्ट्रेलिया दौर्यातून टीम इंडियात पदार्पण केले. त्याने ट्वेण्टी-20 मालिकेत सहा विकेट्स घेतल्या होत्या. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अधिकार्याने सांगितले की, नटराजनच्या गुडघ्याला व खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे ट्वेण्टी-20 मालिकेत त्याचे खेळणे अनिश्चित आहे. राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू राहुल टेवाटिया हाही तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला आणि तोही सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करीत आहे. त्याचेही ट्वेण्टी-20 मालिकेत खेळणे अनिश्चित वाटत आहे. अशात मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चहर याला चक्रवर्थीच्या जागी ट्वेण्टी-20 मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळू शकते.