मुंबई ः प्रतिनिधी
आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवणार्या मुंबई इंडियन्स या वर्षी जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी मैदानात उतरेल आणि त्यांची पहिली लढत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्याशी होणार आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेतील सर्व लढती देशातील सहा शहरांत होणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2020चे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. आता ही स्पर्धा पुन्हा एकदा भारतात आली आहे. स्पर्धेतील पहिली लढत 9 एप्रिल रोजी चेन्नईत गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार्या मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक उंचवला आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली विजेतेपद मिळवले होते. जर त्यांनी या वर्षी विजेतेपद मिळवले तर ती हॅट्ट्रिक ठरेल, तसेच त्यांचे एकूण सहावे विजेतेपद असेल.