अलिबाग ः प्रतिनिधी
सावकारी जाचातून मच्छीमारांची मुक्तता व्हावी आणि बँकेशी नाते जडावे यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेत रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या योजनेला रायगडातील मच्छीमारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार 1002 मच्छीमारांना चार कोटी 38 लाख रुपयांची कर्ज वितरित करण्यात आली आहेत. किसान क्रेडीट कार्ड योजना पूर्वी फक्त शेतकर्यांनाच लागू केलेली होती. आता पशुपालक, मत्स्य व्यावसायिक यांचाही या योजनेत समावेश केला गेला आहे. या योजनेंतर्गत 25 हजारांपासून दोन लाखांपर्यंतचे कर्ज मच्छीमारांना त्याच्या पात्रतेनुसार उपलब्ध होते. जिल्ह्यात चार हजार 177 मच्छीमारांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती. यातील 1002 प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. त्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटपही करण्यात आले. या सर्वांना चार कोटी 38 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले. 917 मच्छीमारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. त्यात दुरुस्ती करून हे प्रस्ताव पुन्हा बँकेकडे सादर केले आहेत, तर दोन हजार 258 मच्छीमारांचे अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.