वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पनवेलमध्ये आयुक्तांचे आदेश
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नियमांचे पालन न करणार्यांवर सक्तीने आणि कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर सक्तीने करावा जेणेकरून स्वतःबरोबरच इतरांनाही कोरोनाची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जे नागरिक मास्कचा वापर करणार नाहीत तसेच होम क्वारंटाइन असताना सार्वजनिक ठिकाणी फिरतील, अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. लक्षणे आढळत नसलेल्या बाधित रुग्णांची तपासणी करून घरी विलगीकरण करण्यात येईल. या रुग्णांच्या हातावर पूर्वीप्रमाणे शिक्के मारण्यात येतील. तसेच त्यांच्या संबंधित सोसायट्यांना त्याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. या रुग्णांवर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व शिक्षकाद्वारे कॉल सेंटरच्या माध्यमातून बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण करण्यात येणार आहे. रुग्ण 14 दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणादरम्यान बाहेर पडला, सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्यावर नागरी आरोग्य केंद्र व वॉर्ड वॉर रूम त्याच्यावर गुन्हे दाखल करेल. अशा रुग्णांचे सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे.
ज्या रहिवासी इमारतींमध्ये पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळतील त्या इमारती प्रतिबंधित (सील) करण्यात येतील. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तत्काळ कोविड चाचणी करण्यात येणार असून ती निगेटिव्ह आल्यास सात दिवसांनी पुन्हा एकदा चाचणी करण्यात येणार आहे. या नागरिकांना सात दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. मास्कचा योग्यरित्या वापर न करणार्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या आणि मास्कचा वापरच न करणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हार्बर उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करताना मास्क न वापरणार्या प्रवाशांवरही कारवाई करण्यात येणार आहे. विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहे. याबरोबरच खेळाचे मैदान आणि उद्यानामध्येही मास्कचा वापर सक्तीचा असून मास्क न वापरणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे.