इंग्लंडविरुद्ध दुसर्या टी-20 सामन्यात विजय; आज तिसरी लढत
अहमदाबाद ः वृत्तसंस्था
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवाचा वचपा काढला आहे. भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार विराट कोहली (नाबाद 73) आणि पदार्पणाचा सामना खेळणार्या इशान किशनचे (56) अर्धशतक याच्या जोरावर भारताने हा सामना 17.5 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात जिंकला आणि पाच सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (दि. 16) याच होणार आहे.
इंग्लंडने दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर के. एल राहुलला सॅम करनने भोपळाही फोडू दिला नाही. यानंतर इशान किशन आणि कर्णधार विराट कोहलीने दुसर्या गड्यासाठी 94 धावांची भागिदारी करीत विजयाचा पाया रचला. या दरम्यान किशनने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने 32 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांसह 56 धावांची खेळी केली. किशन बाद झाल्यानंतर विराटने रिषभ पंतला साथीला घेत भारताला विजयासमीप नेले. पंतने 13 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह 26 धावांची खेळी केली. विराटने 49 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 73 धावांची खेळी साकारली, तर श्रेयस 8 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून सॅम करन, आदिल रशिद आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणार्या इंग्लंडची सुरुवातही खराब झाली होती. भुवनेश्वर कुमारने डावाच्या पहिल्याच षटकात जोस बटलरला (0) पायचित करीत पाहुण्या संघाला पहिला झटका दिला. त्यानंतर जेसन रॉय आणि डेविड मलान या दोघांनी दुसर्या गड्यासाठी 63 धावांची भागिदारी करीत डाव सावरला. इंग्लंडची धावसंख्या 64 असताना युझवेंद्र चहलने आठव्या षटकात डेव्हिड मलानला (24) पायचित करीत ही जोडी फोडली. यानंतर जेसन रॉयचा अडथळा वॉशिग्टन सुंदरने दूर केला. यानंतर जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार इयॉन मॉर्गन जोडीने इंग्लंडला शंभरी पार करून दिली. भारताकडून सुंदर आणि शार्दुलने प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर भुवनेश्वर कुमार आणि चहलने प्रत्येकी एक गडी टिपला.