बंगळुरू ः वृत्तसंस्था
प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी पाटणा पायरेट्सने तेलुगू टायटन्सचा रोमांचक सामन्यात अवघ्या एका गुणाने पराभव केला. पाटणा संघाने हा सामना 31-30 असा जिंकला. त्यांचा हा सलग तिसरा विजय आहे. शेवटच्या चढाईत पाटणाचा संघ जिंकला. संदीप कंडोलाची एक चूक तेलुगू टायटन्सला चांगलीच महागात पडली. या अगोदर दिवसातील पहिला सामना हा बंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झाला. ही लढत बंगालने जयपूरचा 31-28 असा पराभव करीत जिंकली. बंगालला तीन सामन्यांमधील पराभवानंतर हा विजय मिळाला. शेवटच्या 30 सेकंदांपर्यंत बंगालकडे केवळ एका गुणाची आघाडी होती. जयपूरची रेड होती आणि अर्जुन देसवालला दोन गुण घ्यायचे होते, परंतु नंतर नबी बक्सने आपली चपळता दाखवत संघाच्या खात्यात दोन गुण जमा केले आणि बंगालचा संघ जिंकला. बंगालचा सहा सामन्यांतील हा तिसरा विजय, तर जयपूरचा पाच सामन्यांमधील तिसरा पराभव आहे. प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या हंगामासाठी एकूण 12 संघ मैदानात उतरलेले आहेत. गेल्या वर्षी करोना महामारीमुळे ही लीग आयोजित करता आली नव्हती. चाहते या रोमांचक लीगची वाट पाहत होते.