Breaking News

राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवा

पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
  महाराष्ट्रासह गुजरात, केरळमध्येही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 17) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी कोरोना संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवा, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केली.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आणि कोरोनाचा कहर असाच कायम राहिला, तर परिस्थिती हाताळणे कठीण होईल. कोरोनाला रोखणे आताच्या घडीला सर्वाधिक महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी नमूद केले. जागतिक स्तरावरील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे, तर काही देशांमध्ये कोरोनाचे नवे प्रकार आढळून आले आहेत. भारतातही अनेक राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये पॉझिटिव्ह रेट खूप वाढला आहे. कोरोना संसर्गाला वेळीच रोखले नाही, तर त्याचा विपरित परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळू शकतो, अशी भीतीही पंतप्रधान मोदींनी या वेळी बोलताना व्यक्त केली.
जनतेला पॅनिक मोडमध्ये आणता कामा नये. भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाही. कोरोना संकटातून जनतेला दिलासा देण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. गतवर्षीच्या अनुभवातून शिकून नवीन गोष्टी अमलात आणायला हव्यात. राज्यांनी कोरोना चाचण्या वाढवण्यावर अधिकाधिक भर दिला पाहिजे, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी या वेळी केल्या.
कोरोना लशीचे डोस फुकट घालवू नका
देशभरात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा आकडा 10 टक्क्यांवर गेला आहे. असे होता कामा नये. देशात दररोज किमान 30 लाख नागरिकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तसेच राज्यांनी कोरोना लशीचा डोस फुकट जाणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले.  

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply