निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन; कडक कारवाईचे निर्देश


अलिबाग : जिमाका
दिव्यांग मतदारांना मतदान करता येणे सोयीचे व्हावे, म्हणून त्यांना सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. रायगड जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांनी जे मतदान केंद्रांवर पोहचू शकत नाही अशा दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर ने आण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत वाहनांची व्यवस्था करायची आहे, यामध्ये कुचराई केल्यास किंवा टाळाटाळ केल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनादेखील यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत, असे ते म्हणाले. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि. 22) जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या दिव्यांग मतदार सनियंत्रण समितीने केलेल्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीस प्रकाश देवऋषी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपस्थित होत्या.
दिव्यांगांचे मतदान 100 टक्के व्हावे
प्रशासनाने दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरविल्या आहेत. 673 व्हीलचेअर्सची अवश्यकता असून 434 व्हीलचेअर्स खरेदी करण्यात आल्या आहेत. 15 तालुक्यातील 807 ग्रामपंचायत क्षेत्रातील दिव्यांगांसाठी त्या उपयोगात आणल्या जातील. ज्यांना अपंगत्वामुळे शक्य नाही त्यांना ग्रामसेवकांनी स्थानिक वाहने उपलब्ध करून द्यायची असून 23 एप्रिलपूर्वी त्यांनी आपल्या गावांतील अशा दिव्यांग मतदारांचा शोध घेऊन तशी नोंद करून ठेवावी. त्यांची ने आण करण्यासाठी येणारा खर्च ग्रामपंचायत निधीतून करता येईल.
एक दिव्यांग संचलित केंद्र असावे
आयोगाच्या सूचनेप्रमाणे एक मतदान केंद्र दिव्यांग कर्मचारी संचालित असावे. दिव्यांग कर्मचारी शारीरिकदृष्ट्या इतरांपेक्षा काहीसे कमकुवत असले तरी प्रशासनात ते खूप चांगले आणि कार्यक्षमतेने काम करीत आहेत शिवाय महत्वाची जबाबदारीही सांभाळत आहेत अशी उदाहरणे आहेत, त्यामुळे एक मतदान केंद्र तरी दिव्यांग अधिकारी व कर्मचारी असणारे हवे यादृष्टीने त्यांनी सुचना दिल्या. जिल्हा अपंग संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी देखील यादृष्टीने पुरेपूर प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.
केंद्रांवर सर्व सुविधा हव्यात
मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हील चेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांची असून या संदर्भात अतिशय गांभीर्याने काम झाले पाहिजे असे निर्देश डॉ. सूर्यवंशी यांनी दिले. हाशिवरे येथील अंध शिक्षक व समिती सदस्य अशोक अभंगे, प्रिझम सामाजिक संस्थेच्या तपस्वी गोंधळी यांनी देखील यावेळी आपल्या सुचना मांडल्या.
एकूण 9 हजार 706 दिव्यांग मतदार
सर्वाधिक 1828 दिव्यांग मतदार श्रीवर्धन येथे असून त्याखालोखाल 1697 अलिबाग, 1139 पेण, 1086 गुहागर, 1031 महाड, 613 दापोली, 835 उरण, 758 कर्जत, 719 पनवेल अशी त्यांची संख्या आहे. रायगडमध्ये 7394 आणि मावळमध्ये 2312 अशी एकूण 9 हजार 706 दिव्यांग मतदार संख्या आहे. एकूण रायगडमध्ये 2188 मतदान केंद्रांपैकी 1724 दिव्यांग मतदार असलेली केंद्रे आहेत तर मावळ मतदारसंघात 1266 मतदान केंद्रांपैकी 775 दिव्यांग मतदार असलेली केंद्रे आहेत.
असे आहेत दिव्यांग मतदार
रायगड आणि मावळ मतदारसंघात मिळून 1066 अंध, 816 कर्णबधीर, मूक बधीर 306, 5105 विकलांग, 2413 इतर दिव्यांग असे 9706 दिव्यांग मतदार आहेत.
दिव्यांगाना मतदान करता येईल आणि त्यांचे 100 टक्के मतदान होईल ही जबाबदारी विस्तार अधिकारी यांच्यावर असून, याविषयी कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा या राष्ट्रीय कार्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन केले नाही म्हणून कडक कारवाई करण्यात येईल.
-डॉ. विजय सूर्यवंशी, निवडणूक निर्णय अधिकारी, रायगड