

बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र दामोदरदास मोदी ही तीन व्यक्तिमत्व या हिंदुस्थानात हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखण्यात येतात. बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांचं हिंदुत्व आणि नरेंद्र मोदी यांचं हिंदुत्व व त्यांची परिभाषा सारखीच आहे. भारत हा हिंदुस्थान आहे आणि त्याचा हिंदुस्थान हा नामोच्चार सर्रास करण्यात येतो. अगदी शरदचंद्र गोविंदराव पवार असोत की असदुद्दीन ओवेसी असोत या देशाला हिंदुस्थान म्हणूनच संबोधतात. बॅरिस्टर मोहम्मद अली जीना हे 1937 च्या सुमारास बॅरिस्टर सावरकर यांच्या विचारांचा सन्मान करीत असत पण दहा वर्षात इतकी परिस्थिती बदलली आणि इंग्रजांच्या ‘फोडा आणि झोडा’ ‘डिवाईड अॅण्ड रूल’ या नीतिमुळे 1947 साली या अखंड हिंदुस्थानची फाळणी करावी लागली.
1937चे बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांनी 1947 मध्ये महात्मा गांधी यांच्यासमोर देशाच्या फाळणीचा प्रस्ताव ठेवला आणि मुसलमानांसाठी पाकिस्तान तसेच हिंदुंसाठी हिंदुस्थान अशी 14 आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी एका राष्ट्रातून दोन राष्ट्रांची निर्मिती करण्यात आली आणि या अखंड हिंदुस्थानचे दोन तुकडे करून इंग्रज आपल्या देशातून परागंदा झाले. आजही पाकिस्तानच्या राजधानीत सचिवालयावर ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ अशी ठळक अक्षरे अभिमानाने मिरवताहेत पण हे भाग्य ‘हिंदुंचा हिंदुस्थान’ असं वाचण्याचे आपल्या नशीबी नाही. ‘हिंदुराष्ट्र’ हा शब्दसुद्धा आपण उच्चारू शकत नाही. या देशात चीनचा आणि रशियाचा कम्युनिस्ट पक्ष आहे, त्या कम्युनिष्टांना या देशाशी काही देणं नाही की घेणं नाही. माओवाद आणि मार्क्सवाद इतका फोफावलाय की तो हिंदुंना गिळंकृत करतोय की काय अशी शंका यावी. या देशात आलेल्या आक्रमण मोगलांनी आपल्या देवीदेवतांची विटंबना केली. हिंदुंची मंदिरे जमीनदोस्त करून मशिदी बांधल्या. मग 1992च्या 6 डिसेंबरला अयोध्येत बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू पाडण्यात आल्यानंतर हिंदुंना तर ‘रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशा अवस्थेत जगावं लागतंय.
मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. महाराष्ट्रात मराठीला मानाचे पान मिळवून देण्यासाठी मोठे धाडसी पाऊल उचलले आणि फाटक्या वस्त्रांनिशी मायमराठी मंत्रालयाच्या पायथ्याशी सोनेरी मुकुट लेवून उभी असल्याचं ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांनी नमूद केले होते आणि कुसुमाग्रजांची ही इच्छा शिवशाही सरकारचे मुख्यमंत्री डॉ. मनोहरपंत जोशी यांनी 1 मे 1995 रोजी पूर्ण केली. तेलुगु अस्मितेसाठी नंदपुरी तारक रामाराव यांनी तलुगु देसम स्थापन करून नवव्या महिन्यात सत्ता हस्तगत केली पण मराठी माणसासाठी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण होऊनही शिवसेना सत्तेवर येण्यासाठी 35 वर्षे लागली. भारतीय जनता पार्टी आणि 45 अपक्ष आमदारांच्या मदतीने ही सत्ता शिवसेनेला मिळाली. पण केवळ मराठी मराठी करून आपण पाकिस्तानशी मुकाबला करू शकणार नाही अशी भूमिका घेत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हिंदुत्व अंगिकारले आणि या हिंदुत्वाच्या धाग्याने शिवसेना-भारतीय जनता पार्टी युती म्हणून एकत्र आले.
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी पडली तेव्हा जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे, असे उद्गार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते. आणि हे उद्गार संपूर्ण हिंदुस्थानात गाजले. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी बाळासाहेबांचे हे उद्गार आणि बाबरी पाडतानाचे सुप्रसिद्ध छायाचित्रकार मोहन बने यांनी काढलेले छायाचित्र याची एक दिनदर्शिका बनवली पण तीही जप्त करण्यात आली. आक्रमकांनी हिंदुस्थानात येऊन हिंदुंची हजारो मंदिरे धटाशाची करून त्यावर मशिदी बांधल्या आणि हिंदुस्थानातील हिंदुंची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला त्याचे छायाचित्र किंवा त्याचा देखावा आपण आपल्या हिंदुस्थानात लावू शकत नाही? कश्मिरी पंडित कश्मिरमधून बाहेर काढला जातो? प्रभू रामचंद्रांचा जन्म अयोध्येत झाला. आज तिथे रामलल्लाची मूर्ती आहे पण तिथे भव्य राममंदिर होऊ शकत नाही? घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी उर्फ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना घटनेचा मसुदा सुपूर्द केला.
26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. आपला देश धर्मनिरपेक्ष झाला तेव्हापासून आता तर हिंदुंना शिव्या घातल्या की तो झाला धर्मनिरपेक्ष तो झाला सेक्युलर. या देशात प्रत्येकाला त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे ना? तरीही हिंदुंना अन्याय सहन करावा लागतो? बॅरिस्टर वि. दा. सावरकर यांना ब्रिटीशांच्या विरोधात लढण्याचे शिक्षा म्हणून अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तो त्यांचा काळ किती संघर्षमय आणि यातना सहन करण्यात गेला पण त्यांच्याविरोधात बोलणार्यांना लाजा कशार वाटत नाहीत? इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांनी बटवले यांना पाठविलेल्या पत्राची प्रत डॉ. मनोहर गजानन जोशी हे लोकसभेचे अध्यक्ष असताना स्वा. सावरकर यांचे चित्रकर्ती चंद्रकला कुमार कदम यांनी चितारलेले मौलिक संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आले. त्यावेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री (आताचे) सुभाष देसाई यांनी एका छोटेखानी पुस्तकात (रंगीत) छापले. हे पत्र निदान सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींपासून समस्त काँग्रेस कार्यकर्ते वाचण्याचे कष्ट घेतील काय? महाराष्ट्राचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी विश्लेषण करताना भारताचा प्रधानमंत्री हा आतापर्यंत प्रकांडपंडित कसा असायचा हे सोदाहरण पटवून दिले होते. पामलू वेंकट नरसिंहराव हे 14 भाषा जाणणारे प्रकांड पंडित होते. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकालात बाबरी पडली. कोणताही कट्टर मुसलमान हा आक्रमकाने बांधलेल्या मशिदीत नमाज पढत नाही, असं सांगण्यात येतं मग बाबरीचा हट्ट का? असे मुसलमान बांधव म्हणतात पण केवळ आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी लोकांची माथी भडकविण्याचा उद्योग करताहेत. या मातीवर प्रेम असणारे या देशात सुखेनैव राहू शकतात असे असताना विद्वेष पसरविण्याची गरज काय? पण घरात पोथ्या वाचणारे तथाकथित नेते बाहेर सेक्युलरवादाचा बुरखा परिधान करून हिंदुंना शिव्या देण्यात धन्यता मानतात. आपला हिंदुस्थान स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळू शकत नाही? एका घरात तीन-तीन भारतरत्न दिले जाते, पण या देशासाठी प्राणांचे बलिदान करणारे वंचित राहतात. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न किताब द्यावा म्हणून मागणी करावी लागते? सावरकर, बाळासाहेब अशा महान विभूतिंना भारतरत्न देणे हा आपलाच बहुमत ठरेल वास्तविक सावरकर, अटलबिहारी, बाळासाहेब, बाबासाहेब ही खरेतर विश्वरत्न आहेत. पण तथाकथित ढोंगी राजकीय नेत्यांनी या देशाला हिशाहीन करण्याचा प्रयत्न केला. सावरकरांचे चरित्र प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता जर वाचू लागला तर त्याचे मतपरिवर्तन, मनपरिवर्तन निश्चित होऊ शकेल पण घोड्याला लावलेल्या झापडांप्रमाणे जर कुणी वागणार असेल तर त्याला कोण काय करणार?
बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची, महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदु, आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही तर आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, ही सुस्पष्ट परिभाषा, व्याख्या मांडली आणि 1990 साली त्यांनी जाहीर सभेत मांडलेल्या या व्याख्येची मी मुंबई उच्च न्यायालयात डॉ. मनोहर जोशी यांच्या खटल्यात न्या. सॅम परिमाना यांच्या कोर्टात साक्षीदार म्हणून नोंद केली त्या आधारावर 11 डिसेंबर 1995 रोजी सर्वोच्च न्यायालयात जस्टीस जे. एस. वर्मा यांनी डॉ. मनोहर जोशी यांना दोषमुक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाचा प्रचार हा धर्माच्या आधारावरचा नसल्याचे स्पष्ट केले तरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांना जातीयवादी, धर्मांध अशा शब्दांत संबोधण्यात तथाकथित सेक्युलर हे स्वत:ला धन्य मानतात. गोध्रा हत्याकांड झाले, रेल्वेचा एक अख्खा डबा जाळून कारसेवकांचा कोळसा झाला. हे घडविणारे गोध्राचे मुस्लीम नगरसेवक हाजी बिलाल होते. हे त्याचवेळी समोर आले पण 2002ला नरेंद्र मोदी हे हिंदुंचे मसीहा म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्यावर कोणकोणते आरोप करून झोड उठवण्यात आली. हा एक हिंदुहृदयसम्राट गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या रुपाने पहायला मिळाला. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि ज्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना पदावरून हटविण्याचा विचार केला तेव्हा लालकृष्ण अडवाणींना बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितले की, मोदी को हटाओ मत, मोदी गया समझो गुजरातसे भाजप गया? आणि बाळासाहेबांमुळे मोंदीना अभय मिळाले पण मोदी यांनी केवळ धर्माचा विचार न करता पाच कोटी गुजराती बांधवांसाठी विकासाची भूमिका घेतली आणि 26 मे 2014 रोजी 130 कोटींच्या हिंदुस्थानचे पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी, सबका साथ, सबका विकास हा नारा दिला.
हिंदुस्थानचे पंतप्रधानपद स्विकारल्यानंतर त्यांनी भारत स्वच्छता अभियानापासून अनेक योजना यशस्वी करताना या देशात कोट्यवधी शौचालये बांधून मात्र भगिनींच्या अब्रुचे संरक्षण केले. त्यामुळे उत्तर भारतात मुसलमान समाजही मोदीसमर्थक झाला असल्याचे आपल्याला पहायला मिळाले आहे. इशान्येच्या भागात बांगलादेशी घुसखोरांची समस्या मोठी असून तिथल्या स्थानिकांना ती भेडसावत आहे म्हणून आसाम असो वा बंगाल इथे स्थानिकांनी मतदानावर लक्ष केंद्रीत करून काँग्रेस आणि तृणमुलला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी मुंबईत राहणार्या आसामी बंगाली बांधवांनी 40/40, 50/50 हजार रुपये खर्च करून विमानाने जाऊन मतदान केल्याची उदाहरणे पहायला यावेळच्या निवडणुकीत मिळाली. ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांनी ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत, दहशतवाद आपणही रोखू शकतो या विषयावर जे विचार मांडले ते खरे तर संपूर्ण हिंदुस्थानात पसरविण्याची गरज आहे. त्यात मग माओवादी, नक्षलवादी, बांग्लादेशी घुसखोर यांना आपल्याच देशातल्या तथाकथित राजकारण्यांची साथ कशी मिळते, हे समजून येईल. भीमा-कोरेगाव प्रकरण असो की नक्षलवाद्यांनी केलेली हत्या हे सारे आपल्या देशाच्या सुरक्षितता, सार्वभौमता आणि एकतेवर घाला घालणारे ठरत आहे पण त्याबद्दल बोलण्याऐवजी तथाकथित स्टंटमॅन हिंदुत्ववाद्यांना झोडण्यात धन्यता मानत आहेत. सहिष्णू समाज हा हिंदू समाज असल्यामुळे तो कधीही सहन करू शकेल असा त्यांचा समज आहे. मालेगाव बॉम्बस्फोट झाले त्याच्या दुसर्या दिवशीची वृत्तपत्रे काढून पाहिलीत तर तो बॉम्बस्फोट लष्कर ए तोयबाने घडविण्याचे दिसून येते पण भगवा आतंकवाद आणि हिंदु दहशतवाद असा शब्दप्रयोग करून तत्कालिन राज्यकर्त्यांनी हिंदुत्ववाद्यांना अडकविण्याचे षड्यंत्र रचले आणि त्यामुळे निर्दोष लोकांना नऊ नऊ वर्षे शारीरिक, मानसिक यातना सहन कराव्या लागल्या. या देशातल्या न्यायव्यवस्थेवर सर्वांचा विश्वास आहे त्यामुळे न्यायदेवता जो निर्णय देईल तो निष्पक्षच असेल पण निकालापूर्वीच कुणाला झोडपून काढायचे हे प्रकार सर्रास चालू आहेत.
मुसलमान समाज हा हिंदुस्थानात जेवढा सुरक्षित आहे तेवढा तो पाकिस्तानात नाही. पाकिस्तानातल्या मशिदींवरचे भोंगे काढून टाकण्यात आले पण हिंदुस्थानात लोकांची सकाळ मशिदीवरच्या भोंग्यावरून होणार्या बांगेने होते हे तर सत्यच आहे. हिंदु-मुस्लीम एकतेची अनेक उदाहरणे देण्यात येतात पण माथी भडकवणारे काही नतद्रष्ट कमी नाहीत. साध्वी प्रज्ञासिंहने नथुराम गोडसेंचे गोडवे गायिले त्याबरोबर त्यांना झोडण्याचे काम सुरू झाले पण साध्वींची प्रतिक्रीया ही कमल हसनच्या वादग्रस्त विधानावर होती त्या कमल हसनचे काय?
या देशात काहीजण हे स्वत:ला हुतात्मा करवून घेण्यासाठी धडपडतोय आणि त्यातून वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धी मिळवताहेत. नथुराम गोडसे यांच्यावरचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे प्रदीप दळवी आणि उदय धुरम यांचे नाटक जरा पहा, आचारस्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्याच्या नुसत्या गप्पा मारू नका. जर खरेच आचार स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य मानत असाल तर हे नाटक शांत डोक्याने पहा आणि आपले पूर्वग्रहदूषित डोके बाजूला ठेवा. निश्चितच त्या डोक्यात प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. पण केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सावरकरांना, गोडसेला शिव्या घालणे, हिंदुंना शिव्या देणे या गोष्टी सर्रास तथाकथित राजकारणी नेत्यांकडून चालताहेत. पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी गत सत्तेवरून दूर गेलेल्यांची झाली असल्याने हे प्रकार चालले आहेत. मग ज्यात मार्गदर्शक म्हणून ज्यांनी वावरावे अशी अपेक्षा असते तेही जर चिथावणी देत असतील तर त्याला कोण काय म्हणणार? एका बाजूला गांभीर्याने शपथ घ्यायची आणि मग सिद्धीविनायकापासून पांडुरंगापर्यंत पाया पडायच्या. हिंदुंना शिव्या घालताना आम्ही कसे शिवभक्त आहोत याचा डांगोरा पिटायचा हे सध्या सुरु आहे.
कोणत्याही धर्माने नफरत, दुस्वास, द्वेष शिकविला नाही. एकमेकांचा आदर करण्याची, बंधुभाव, सौदार्ह, सौजन्य, सहिष्णुतेची शिकवण दिली आहे. पण तोंडाने प्रेम शब्द बोलणे आणि भाषणे मात्र शिव्यांची लाखोली भरलेली द्यायची. हेच तुमचे जर प्रेम असेल तर मग नफरत ती कोणती? अयोध्येत राममंदिर व्हावे म्हणून बाबराच्या वंशजाने एक पत्र दिले असून त्याने त्या पत्रात माफी मागितली आहे आणि हिंदु मुस्लीम सौहार्दासाठी राममंदिर निर्माण कार्याला मदत म्हणून सोन्याची वीट देण्याचा इरादा दाखवला आहे. नरेंद्र मोदींचा, सबका साथ, सबका विकास या घोषणेत फक्त हिंदु नव्हे तर 130 कोटी देशवासियांचा, सर्व धर्मियांचा समावेश होतो, हे जरा समजून घ्या. बहुसंख्य हिंदु असलेल्या या हिंदुस्थानात सारेजण एकोप्याने, गुण्यागोविंदाने राहत असताना या देशाच्या विकासासाठी झटत असताना त्यांना साथ देण्याऐवजी समाजात दुही माजवू नका. सर्वांना गुण्यागोविंदाने राहू द्या. सर्वांचा आदर करा. की फक्त या हिंदुस्थानात हिंदुंनी आणि महाराष्ट्रात मराठी माणसाने केवळ शिव्या आणि मारच खायचा? हे कुठपर्यंत चालणार? याचा जरा समाजधुरिणांनी शांत डोक्याने विचार करा. अन्यथा तुमच्या भांडणात सामान्य माणूस भरडला जाईल हे ध्यानात ठेवा. नितीन गडकरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मतभेद जरूर असावेत, मनभेद नसावेत. केवळ निवडणुकीच्या वेळी राजकारण, निवडणुका संपल्या की सर्वांनी हातात हात घालून देशाचा विकास कसा होईल हे पाहणे महत्वाचे आहे. सबका साथ, सबका विकास ही मोदींची संकल्पना तंतोतंत अंमलात आणली तरीच अच्छे दिन येतील.
-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर
RamPrahar – The Panvel Daily Paper