पनवेल : प्रतिनिधी
खारघर गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्यासाठीच्या नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पनवेल महापालिकेच्या सोमवारी (दि. 22) झालेल्या सर्वसाधारण महासभेत 11 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याने आता खारघर गाव स्मार्ट व्हिलेज होईल, अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी दिली आहे. पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली. त्यावेळी महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सिडको नोडच्या वसाहतीचे महापालिकेकडे हस्तांतरण झाले नसल्याने महापालिकेला त्याठिकाणी कोणत्याही योजनेवर खर्च करता येत नव्हता. त्यामुळे सिडको वसाहतीतून निवडून आलेल्या नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. खारघरमधील नगरसेवक प्रवीण पाटील यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली खारघर गावाच्या विकासासाठी पाठपुरावा केला. त्याला यश येऊन आजच्या महासभेत खारघर गावासाठी 11 कोटींची विकासकामे मंजूर करण्यात आली. यामध्ये खारघर गावामध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी 11, 38,12,766 रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे. यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी उंच जल कुंभ (क्षमता पाच लाख लीटर) व विद्युत व्यवस्था 2,86,39,227 रुपये, मलनिस्सारण वाहिन्या जोडणे 1,65,02,169 रुपये, रस्ते 2,18,14,272 रुपये, पावसाळी गटारे 2,05,06,534 रुपये, विद्युत वाहिन्याकमी दाबाच्या भूमिगत करणे 2,63,50,563 रुपये अशी कामे मंजूर करण्यात आल्याबद्दल नगरसेवक प्रवीण पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले आहेत.