पेण ः प्रतिनिधी
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींची वसुली करण्याची मागणी केल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने राज्याच्या गृहमंत्र्यांवर असे आरोप केल्याने राज्याची प्रतिमा मलीन झाली आहे. या आरोपाची पारदर्शकपणे चौकशी होण्याकरिता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. पत्रकार परिषदेस भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, प्रा. लक्ष्मण जांभळे आदी उपस्थित होते.
आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येत असून सरकारमधील मंत्र्यांवर विविध आरोप होत आहेत. आता तर गृहमंत्र्यांवरच एक वरिष्ठ पोलीस अधिकार्याने गंभीर आरोप केल्याने हे खंडणी वसुली करणारे सरकार असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. या सरकारच्या काळात महिला अत्याचारांसह विविध गुन्ह्यांत वाढ झाली असून एकीकडे कोरोना व दुसरीकडे कायदा-सुव्यवस्थेच्या कचाट्यात सामान्य माणूस होरपळून निघाला आहे.
पोलीस खात्यावर दबावतंत्र वापरून महिन्याला 100 कोटी रुपये मागणार्या भ्रष्ट मंत्र्याचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. जोपर्यंत अनिल देशमुख राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरकारविरोधातील लढा सुरूच ठेवणार असल्याचेही या वेळी आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले.